नाशिक : येथे वास्तव्यास असलेल्या सहा महिलांना पाकिस्तानात पाठविण्याबाबतचे आदेश अद्यापपर्यंत पोलिस प्रशासनास प्राप्त झाले नसले, तरी या महिला मागील २० ते २५ वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्य करीत असल्याने अन् त्यांचे सासर नाशिक असल्याने त्यांना पाकिस्तानात पाठविण्याचा मोठा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना, पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ पाकिस्तानात पाठविण्याच्या निर्णयाची अंलमबजावणीचे आदेश दिले आहेत. नाशिकमध्ये सहा पाकिस्तानी महिला मागील २० ते २५ वर्षांपासून दीर्घकालीन व्हिसा घेऊन वास्तव्यास आहेत. या सर्व पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्या महिलांचे माहेर पाकिस्तान असून, सासर नाशिक आहे. मात्र, केंद्र सरकारने भारत सोडण्याचे आदेश दिल्याने, त्यांना पाकिस्तानात पाठविले जाऊ शकते. दरम्यान, स्थानिक पोलिस यंत्रणेला याबाबतचे आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याने, या महिलांना देश सोडावा लागणार का, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार या महिला आपल्या संसारात सुखी असल्याने, पुन्हा पाकिस्तानात जाण्याची त्यांची इच्छा नाही. अशात त्यांच्या दीर्घकाळाच्या वास्तव्याबरोबरच त्यांचे वर्तन, कायद्याचे पालन आदी गोष्टी लक्षात घेता, त्यांनी केंद्र सरकारकडे परवानगीसाठी एफआरओमार्फत अर्ज केल्यास, त्यांचा व्हिसा रद्द न करता नूतनीकरणाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशीही माहिती समोर येत आहे. मात्र, यात स्थानिक पोलिस व जिल्हा प्रशासनाची शिफारस महत्त्वाची ठरणार आहे.
विवाहामुळे भारतात आलेल्या महिलांना भारतीय नागरिकत्व कायद्यानुसार कायमस्वरूपी नागरिकत्व प्राप्त होऊ शकते. त्यासाठी संबंधित महिलांनी भारतीय दूतावासात अर्ज करावा लागतो. त्या अर्जाची पडताळणी पाकिस्तान सरकारमार्फत झाल्यावर व त्यानंतर 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' मिळाल्यावर भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात येते. मात्र, सद्यस्थिती बघता, ही प्रक्रिया पार पाडणे म्हणावे तितके सोपे नसल्याचेही बोलले जात आहे.
शहरात वास्तव्यास असलेल्या सहाही पाकिस्तानी महिलांना भारत सोडण्याबाबतचे कोणतेही आदेश अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाहीत. आदेश प्राप्त होताच, त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल.संदीप मिटके, सहायक पोलिस आयुक्त, नाशिक