येवला (नाशिक) : संतोष घोडेराव
येवला म्हटलं की, प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर उभी राहते ती कलाकृतींनी सजलेली, फुललेली, नाजूकशी अप्रतिम पैठणी ...प्रत्येक स्त्रीच्या मनावर अधिराज्य गाजविणारी व स्त्रीचं रूप फुलविणारी अस्सल पैठणी बनते ती नाशिक जिल्ह्यातील येवल्यात.. म्हणुनच की काय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत भरजरी वस्त्र म्हणून पैठणीला मानाचं स्थान आहे.
पैठण रेशीम व जरीच्या व्यापाराचं महत्त्वाचं ठिकाण
तशी तर पैठणी बनवण्याची कला साधारण दोन हजार वर्ष जुनी आहे. कालौघात ती आधुनिक बनली. पैठणीचं मूळ गाव मराठवाड्यातलं पैठण. प्राचीन काळात पैठण रेशीम व जरीच्या व्यापाराचं महत्त्वाचं ठिकाण होतं. त्या वेळी रोमन देशाच्या राजाला कापसाचं सूत व रेशीम धागा निर्यात होत असल्याचं सांगितलं जातं.
मराठी सौभाग्याचं लेणं
अठराव्या शतकात पेशव्यांनी पैठणीच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिल्याचं सांगितलं जातं. मजल दरमजल करत पैठणीने अनेक स्थित्यंतरं पाहिली. कालप्रवाहात राजे-राजवाडे, वेद पंडितांची परंपरा, हिरे-माणकांची व्यापारपेट नामशेष झाली; पण समृद्ध भूतकाळाच्या स्मृती जागवणारा एक दावा आजही कायम आहे, तो म्हणजे इंद्रधनुष्यी रंगांचं, मऊ-मुलायम रेशमी पोत व सुवर्णतंतूंनी गुंफलेलं हे मराठी सौभाग्याचं लेणं असलेली पैठणी.
पैठणीतून मिळाला हक्काचा रोजगार
येवला शहरामध्ये घरोघरी पैठणीचे माघ असून पैठणीचे कारागीर आपल्या हस्त कलेतून आपल्यातील कल्पना शक्तीला वाव देत सुंदर अशी पैठणी तयार करत असून या पैठणीच्या व्यवसायातून कित्येक तरुण बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळाला आहे.
असा सुरू झाला भरजरी पैठणीचा प्रवास
सोळाव्या शतकात राजे रघूजीबाबा नाईक यांनी येवलेवाडीची स्थापना केली. त्याचवेळी पैठण शहरातून कारागीर आणून येवलेवाडीच्या भरभराटीसाठी येवल्यात पैठणी व्यवसाय सुरू केला. तो भरभराटीला आणण्यासाठी कारागिरांना आश्रय दिला. त्यानंतर सुमारे साडेचारशे वर्षांचा काळ लोटला. पण हे देखणं वस्त्र अधिक सुंदर होत गेलं. अंगभूत कलात्मकतेच्या बळावर विणकरांनी वर्षानुवर्ष हातमागावर या महावस्त्राला अधिकाधिक देखणं रूप प्राप्त करून दिल्याने हा वारसा चिरकाल टिकून आहे. पैठणी हा हस्तकलेचा सुंदर नमुना असून या महावस्त्राला प्राचीन वारसा, पुरातन परंपरा असून दोन हजार वर्षाचा संपन्न इतिहास आहे.
नव्या फॅशनलाही येवल्याची पैठणी मागे टाकतेय
अस्सल देखणेपणाचा सन्मान लाभलेल्या पैठणीचा तोरा वाढतोय. नव्या फॅशनलाही येवल्याची पैठणी मागे टाकतेय, हे नक्की...! येवला शहराची संपूर्ण बाजारपेठ पैठणीच्या उलाढालीवर अवलंबून आहे. 'येवला वजा पैठणी बरोबर शून्य' असं इथल्या बाजारपेठेचं समीकरण, मध्यंतरी मंदीच्या गर्तेत सापडलेल्या पैठणीने पुन्हा एकदा वैभवाच्या शिखराकडे वाटचाल सुरू केली. विणकरांचे व कारागिरांचे अथक परिश्रम असलेल्या या व्यवसायात येवला व परिसरात सुमारे तीन ते साडे तीन हजार हातमागांची संख्या आहे. सुमारे १० हजारांवर हातांची पैठणी आधारवड असून वर्षाला तब्बल ३५० ते ४०० कोटींची उलाढाल होते हे मात्र विशेष.....