नाशिक : आगामी सिंहस्थ-कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमध्ये देश-विदेशातील कोट्यावधी भाविक येण्याची शक्यता असून, नाशिकच्या हवाईमार्गाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे नाशिकच्या ओझर विमानतळाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून विस्तार करावा, अशी मागणी नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा शिष्टमंडळाने केंद्रीय नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ बुधवारी (दि.४) नाशिक दौऱ्यावर आले असता, निमा शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी नाशिकच्या विमानसेवेचा आंतरराष्ट्रीय विस्तार व्हावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. याबाबतचे निवेदनही त्यांना दिले. आगामी सिंहस्थात नाशिकमध्ये बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आध्यात्मिकदृष्ट्या व्यवस्थापन करण्याबरोबरच वाहतुक, सुरक्षा आणि पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. नाशिकच्या विमानसेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून विस्तार झाल्यास, आणखी प्रवाशी संख्या वाढण्याची शक्यता आहे. नाशिक विमानतळावर प्रवासी टर्मिनल, विमानतळ धावपट्टी, पार्किंग आदींमध्ये सुधारणा करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी, नाशिक विमानतळाबाबत आवश्यक त्या सुधारणा केल्या जाणार असून, त्यासंदर्भातील प्रकल्पांना प्राधान्य देणार असल्याचे म्हटले. याप्रसंगी निमा अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, सहसचिव किरण पाटील, गोविंद बोरसे आदी उपस्थित होते
नाशिक, ओझर विमानतळाचे विस्तारीकरण केल्यास, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होईल. याशिवाय औद्योगिक वाढीसही चालना मिळेल. राेजगारनिर्मिती होईल. नाशिकसाठी आर्थिक प्रगतीचे नवे दरवाजे खुले होतील, असेही निवेदनात नमुद केले.