ओझर : पुढारी वृत्तसेवा
मुंबई - आग्रा महामार्गावरील ओझर येथील सायखेडा चौफुलीजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक नाशिककडे जाणाऱ्या लेनला उड्डाणपुलावर एक मोठे व एक छोटे भगदाड पडल्यामुळे तसेच काही ठिकाणी चिरा पडल्याने पुलावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. महामार्ग प्राधिकरणामार्फत पडलेला स्लॅब दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर असून, किमान सात दिवस एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे.
पिंपळगाव - गोंदे या सहापदरी महामार्गावर सध्या दहावा मैल आणि गरवारे पॉईंट येथे उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. मुंबई - आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.
सध्या महामार्गावर दोन ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे दिवसभर गरवारे पॉईंट ते जैन मंदिर धाम दरम्यान वाहतूक कोंडी हा नित्याचाच भाग झालेला आहे.
त्यात ओझर शहराजवळ उड्डाणपुलाला एक मोठे व एक छोटे भगदाड पडल्यामुळे उड्डाणपुलावरील त्या बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
पिंपळगावकडून येणारी वाहतूक तसेच नाशिककडून येणाऱ्या उड्डाणपुलावरून जाणाऱ्या लेनने वळवून मंत्र टेक्सटाईलसमोर कट करून पुन्हा नाशिककडे जाणाऱ्या लेनने वळवण्यात आली आहे.
शनिवारी (दि. २५) तब्बल पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच राज्य परिवहन मंडळाची बस नादुरुस्त झाल्यामुळे कोंडीत अधिक भर पडली होती.
उड्डाणपुलाला भगदाड पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिस प्रशासनाने स्थळाची पाहणी करून धोकादायक भागात बॅरिकेटिंग करून वाहतूक वळविली होती. आता त्या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.