Nashik Airport  Pudhari News Network
नाशिक

Nashik Airport | नाशिकच्या ओझर विमानतळाचा गगनभरारी; एकाच दिवसात 1,973 प्रवाशांचा नवा उच्चांक

Nashik Airport | ओझर विमानतळावरून शनिवारी (दि. ७) प्रवासीसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला. या दिवशी सात विमानांद्वारे 1 हजार 973 प्रवाशांनी नाशिकला ये-जा केली.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ओझर विमानतळावरून शनिवारी (दि. ७) प्रवासीसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला. या दिवशी सात विमानांद्वारे १ हजार ९७३ प्रवाशांनी नाशिकला ये-जा केली. ८५८ प्रवाशांचे आगमन झाले, तर ९३५ जणांनी प्रस्थान केले. यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये एकाच दिवशी सर्वाधिक १६२३ प्रवाशांनी ये-जा केल्याची नोंद होती.

शनिवारी (दि. ७) दिल्ली आणि हैदराबाद येथून प्रत्येकी दोन, तर गोवा-अहमदाबाद, इंदूर आणि बंगळुरू येथून प्रत्येकी एक अशा सात विमानांच्या फेऱ्या झाल्या. यातून विक्रमी १,९७३ प्रवाशांची नोंद झाली आहे.

दरम्यान, नाशिकच्या ओझर विमानतळावरून दरवर्षी प्रवासी संख्येचा उच्चांक नोंदविला जात आहे. आता विमानतळाच्या विस्तारीकरणानंतर प्रवाशांची संख्या आणखी वाढणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून विमानतळाच्या ओझर विस्तारीकरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि. ८) प्रारंभ करण्यात आला.

या प्रकल्पासाठी एकूण ५२७.५१ कोटींचा निधी खर्च केला जाणार असून, त्यामुळे विमानतळाची क्षमता सध्याच्या प्रतिताशी तीनशेवरून एक हजार प्रवाशांवर (दरवर्षी पन्नास लाख) जाणार आहे.

विमानांच्या पार्किंगची क्षमता सहावरून बारा होणार आहे. विमानतळाच्या नूतन इमारत आराखड्यात २४ चेक-इन काउंटर, सामान हाताळणी, सुरक्षा तपासणी व व्यावसायिक जागा असलेल्या तळमजल्याचा समावेश आहे.

'निमा'च्या पाठपुराव्याला यश

विमानतळाचे विस्तारीकरण हे 'निमा'सह औद्योगिक व्यापारी संघटनांच्या पाठपुराव्याचे फलित असल्याचे 'निमा'चे अध्यक्ष आशिष नहार व उपाध्यक्ष मनीष रावल यांनी म्हटले आहे.

औद्योगिक विकासासाठी नाशिक हेच एकमेव महत्त्वाचे स्थळ असल्याने ओझर विमानतळाचा विस्तार करावा, नाइट लैंडिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते.

त्यानुसार कार्यवाही होत असून, लवकरच नाशिकला आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करावी, असेही नहार व रावल यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत 'निमा'च्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT