नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कुपोषित बालकांच्या शोधमोहिमेत जिल्ह्यात तब्बल ३,६७२ कुपोषित बालके असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यात ४६३ सॅम अर्थात अतितीव्र कुपोषित बालकांचा, तर ३,२०९ मध्यम तीव्र कुपोषित बालकांचा समावेश आहे. या सर्व बालकांना कुपोषणाच्या गर्तेतून बाहेर काढण्याबरोबरच जिल्ह्यामध्ये कुपोषण निर्मूलन मोहीम प्रभावीपणे राबविताना अशा बालकांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि आहारविषयक सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहामध्ये मंगळवारी (दि. २५) आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या सूचनेनुसार, जिल्ह्यात जुलै महिन्यामध्ये शोधमोहीम राबविण्यात आली होती. यात आरोग्य व एकात्मिक बालविकास प्रकल्प (आयसीडीएस) विभागांतर्गत विशेष पथक तयार करून जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
त्यानुसार जिल्हा परिषदेंतर्गत एकूण २६ कार्यरत प्रकल्पांमध्ये शून्य ते सहा वर्षे वयोगटातील एकूण तीन लाख २३ हजार ३७७ बालके असून, त्यापैकी तीन लाख १२ हजार २३८ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण ४६३ सॅम, तर ३२०९ मॅम बालके आढळली. या बालकांना संदर्भसेवा देण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
तसेच कुपोषित बालकांना वैद्यकीय शस्त्रक्रिया व आहार विषयक मदत द्यावी. यातून ही बालके कुपोषण मुक्त होऊन सर्वसाधारण श्रेणीत येतील अशा पद्धतीने नियोजन करावे, सर्व अंगाणवाडीसेविका, पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी कुपोषण निर्मूलनावर भर देऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुपोषित बालकांवर सनियंत्रण करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केल्या आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पोषण दूत अभियान राबविण्यात येत असून, जिल्ह्यात असलेल्या पोषण पुनर्वसन केंद्रात या बालकांना उपचार देण्यात येत आहेत. तसेच अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करून त्यांचा आहार व आरोग्याचे निरीक्षण करून मार्गदर्शन व सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.