नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथील अशोक खरात प्रकरणाने राज्यभरातील भोंदूगिरीचा मुद्दा ऐरणीवर आणल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यामध्ये १०० हून अधिक भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. यात महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, भीती दाखवून पैसे उकळणे, जादूटोणा व अघोरी उपचारांच्या नावाखाली फसवणूक अशा प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे.
नाशिक आणि पुणे जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीय असल्याचेही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) संकलनातून समोर आले आहे.
अशोक खरात प्रकरणाला गुरुवारी (दि. १७) सहा महिने पूर्ण होत असताना, महाराष्ट्र अंनिसने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दाखल १०० प्रकरणांची यादी जाहीर केली आहे.
यातील गुन्हे जादूटोणाविरोधी कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार दाखल झाल्याचे समितीने म्हटले आहे. करणी-भानामती काढणे, अंगातील भूत उतरवणे, अघोरी पूजा, कौटुंबिक समस्या सोडवणे, आर्थिक अडचणी दूर करणे, आजारपण बरे करण्याचा दावा करणे, पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणे अशा विविध प्रकारांनी भाविकांची फसवणूक केली जात असल्याचे दाखल प्रकरणांतून समोर येत आहे.
ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागांतही अशा प्रकारांची व्याप्ती असल्याचे दाखल गुन्ह्यांवरून स्पष्ट होत आहे. विशेषतः महिलांच्या लैंगिक शोषणाबरोबरच आर्थिक लुटीच्या तक्रारी अधिक आहेत. महाराष्ट्रात २०१३ मध्ये 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम, २०१३' अस्तित्वात आला. महाराष्ट्र हे असा स्वरूपाचा कायदा करणारे देशातील पहिले राज्य ठरले.
मात्र, या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियम अद्याप तयार झालेले नसल्यामुळे पोलिस यंत्रणेत काही ठिकाणी संभ्रम निर्माण होत असल्याचा दावा अंनिसने केला आहे. परिणामी अशा प्रकारांना बळी पडलेल्या अनेक व्यक्ती भीती, सामाजिक प्रतिष्ठा आणि कुटुंबावरील परिणामाच्या चिंतेमुळे पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत. खरात प्रकरणानंतर पीडितांना पुढे येण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी बळ देण्याचे काम अंनिस करीत असल्याचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, कृष्णा चांदगुडे, ॲड. रंजना गवांदे, विष्णुदास लोणारे यांनी सांगितले.
"भोंदू कितीही मोठा असला, तरी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करता येतो, याची पीडितांना शाश्वती मिळाली आहे. त्यांना महाराष्ट्र अंनिसने मानसिक आधार व पाठबळ दिले. पीडितांनी अंनिसशी किंवा संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा."— कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस
अंनिसने प्रसिद्ध केलेल्या १०० प्रकरणांच्या यादीत नाशिक आणि पुणे जिल्ह्यांमधील अनेक प्रकरणांचा समावेश आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर, मुंबई, सोलापूर, अकोला, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, अमरावती, धुळे, ठाणे, रायगड, पालघर, सांगली, कोल्हापूर, भंडारा, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल गुन्हे एखाद्या विशिष्ट धर्मापुरते मर्यादित नसून, सर्वच धर्मांमध्ये भोंदूगिरी असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत म्हटले आहे.
महिलांच्या शोषणाची प्रकरणे अधिक
धार्मिक शहर नाशिक, विद्येचे माहेरघर पुण्यात सर्वाधिक प्रकरणे
श्रद्धेचा फायदा घेऊन आर्थिक लुटीचेही प्रकार
खरात प्रकरणानंतर पीडित स्वतःहून येत आहेत पुढे
भीती, श्रद्धा आणि अडचणींचा गैरफायदा घेत असल्याचे उघड