सिन्नर नाशिक
सिन्नर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास निवेदन देताना घोरवड ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ. (छाया : संदीप भोर )
नाशिक

Nashik News | घोरवड शिवारात होणार मुक्त विद्यापीठ विस्तारित केंद्र

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विस्तारित केंद्र सिन्नर तालुक्यातील घोरवड येथे उभारण्याच्या हालचालीना वेग आला आहे. विस्तारित केंद्रासाठी आवश्यक जवळपास १०० एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत घोरवड ग्रामपंचायतीचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. तथापि, ग्रामस्थांनी काही अटी-शर्ती घालून ही जागा उपलब्ध करून दिली असल्याचे सांगितले. त्याबाबतचे निवेदन मुक्त विद्यापीठास मंगळवारी (दि.२३) रोजी देण्यात आले.

मुक्त विद्यापीठाचे केंद्र उभारल्यानंतर परिसरातील सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना ज्ञानाची कवाडे खुली होणार आहेत. आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय तसेच अन्य वंचितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच व्यवसायाभिमुख शिक्षण, कृषी शिक्षण तसेच बहिःस्थ- दूरस्थ शिक्षणाबरोबरच ऑनलाइन शिक्षणाचा लाभ होणार आहे.

घोरवड ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. १४ मधील ४१.७७ हेक्टर पैकी २०.८५ हे. व गट क्र.१७ मध्ये १९.१७ हे. पैकी १९.१५ क्षेत्र इतकी जमीन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठास उपलब्ध करून देण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. सूचक म्हणून रमेश हगवणे, अनमोदक म्हणन किरण हगवणे यांनी स्वाक्षऱ्या केल्या, यावेळी उपसरपंच अंबादास भुजबळ, विकास तळपे, लहानू हगवणे तसेच रामदास हगवणे, सुकदेव हगवणे, राजाराम हगवणे, सुकदेव लहामटे, किरण हगवणे, अरुण लहामटे, नागेश लहामटे, कचरू हगवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांनी ठेवल्या अटी-शर्ती

विस्तारित केंद्राच्या करपात्र इमारतीचे कर मुदतीत भरणे बंधनकारक राहील, मुख्य प्रवेशद्वाराशेजारी व हायवेलगत ग्रामपंचायत मालकीची ८० आर जागा शिल्लक ठेवावी, विद्यार्थ्यांना फी सवलत (मोफत शिक्षण) देण्यात यावे, वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी भरतीत स्थानिक तरुण-मजुरांना प्राधान्य देऊन ३० टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करावे, उपाहारगृह उभारायचे असल्यास त्याचा मक्ता स्थानिक स्वराज्य संस्था व बचतगटास द्यावा, ग्रामपंचायतीकडून जमीन ताब्यात घेतल्यापासून बखळ जागेचा प्रतिवर्षी सात लाख रुपये कर ग्रामपंचायतीला देणे बंधनकारक राहील, ठरलेल्या मुदतीत काम न झाल्यास ही जमीन पुन्हा ग्रामपंचायतीकडे वर्ग केली जाईल. संचालक मंडळ स्थापन झाल्यास त्यामध्ये गावातील तत्कालीन अथवा विद्यमान सरपंच यांना सदस्य म्हणून घेण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन ग्रामस्थांनी मुक्त विद्यापीठास सादर केले.

विद्यापीठामुळे साहजिकच गावाला विशेष महत्त्व येणार असून, बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे गावातील शेतकऱ्यांना कृषी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून निश्चितच फायदा होईल. तसेच विद्यापीठ स्थापन झाल्यास त्यांच्यामार्फत गावाचा सर्वांगीण विकास होईल.
चंद्रकला लहामटे, सरपंच, घोरवड, सिन्नर.
SCROLL FOR NEXT