सटाणा : सुरेश बच्छाव
चालू वर्षी कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसतानाच कांदा बियाण्यांच्या दरात मात्र किलोमागे तब्बल ५०० ते ६०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हे बियाणे कंपन्यांच्या नफेखोरीवर तीव्र नाराजी व्यक्त करत असून, शासनाने बियाण्यांच्या दरांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी होत आहे.
तालुका उन्हाळी कांदा उत्पादनात आघाडीवर आहे. दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबरपासून कांदा बियाण्यांची पेरणी करून रोपवाटिका तयार केल्या जातात. मागील वर्षी परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रोपे नष्ट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. मोठ्या कष्टाने रोपे तयार करून लागवड केलेल्या कांद्याला मात्र यंदा अत्यल्प दर मिळत आहेत. सप्टेंबर महिना सुरू असूनही कांद्याच्या भावात वाढ दिसत नाही. उलट चाळीत ठेवलेले कांदे खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांना कमी भावात कांदा विकावा लागत आहे.
दरम्यान, पुढील वर्षीच्या कांदा उत्पादनासाठी रोपवाटिकांची लगबग सुरू झाली आहे. गेल्या वर्षी बियाण्यांची मोठी टंचाई भासल्याने यंदा शेतकरी लवकरच बियाण्यांच्या शोधात दुकाने गाठत आहेत. मात्र, दरवाढीमुळे शेतकरी संभ्रमित झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कांदा बियाण्याचे दर ५०० ते ६०० रुपयांनी वाढले. कांद्याला बाजारभाव मिळत नसताना बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बियाणे उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांच्या अडचणींचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप होत असून, शासनाने या दरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.
पारंपरिक बियाणे इतिहासजमा
बहुतांश कांदा उत्पादक शेतकरी बियाणे स्वतःच तयार करत होते. निवडक कांद्याचे टोंगळे लावून त्यापासून बियाण्याचे उत्पादन घेत. अलीकडे अवकाळी पाऊस, गारपीटमुळे टोंगळे खराब होऊन बियाण्याला मुकावे लागते. नाइलाजाने शेतकरी कंपन्यांच्या बियाण्यांकडे वळला आहे. मधमाश्यांचे प्रमाण कमी होऊन परागीकरण न झाल्यानेही पारंपरिक बियाण्यांची उत्पादन क्षमता रोडावली आहे. साहजिकच पारंपरिक बियाणे तयार करण्याचे प्रमाण अलीकडे कमी झाले आहे.
कांद्याला उत्पादन खर्च एवढाही 66 बाजारभाव मिळत नाही. तेच बियाण्यांच्या दरात मात्र दरवर्षी वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत असून, शासनाने बियाण्यांच्या दरांवर नियंत्रण आणण्याची गरज आहे.केशव सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना