कळवण (नाशिक) : कांदा भावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून शुक्रवारी (दि. १२) कळवण येथील संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातून कांद्याचे ट्रॅक्टर थेट कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय कार्यालयात आणत शासनाचा निषेध व्यक्त केला. प्रशासकीय कार्यालय आवारातच कांद्याचा लिलाव करण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी लावून धरली. अखेर पाच तासांच्या आंदोलनानंतर प्रशासकीय कार्यालय आवारातच लिलाव करण्यात आले.
शेतकऱ्यांकडील कांदा कवडीमोल भावाने खरेदी केला जात असून नाफेड मात्र, चढ्यादराने बाजारात विक्रीसाठी आणत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांकडील कांदा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नाफेडला बाजारात कांदा विक्रीची परवानगी देऊ नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास रौंदळ, रमेश बच्छाव, काशिनाथ गुंजाळ, रामा पाटील, विनोद खैरनार, शशी हिरे यांनी कांदा उत्पादकांच्या भावना प्रशासनापुढे मांडल्या. प्रशासकीय कार्यालयाच्या आवारातच आलेल्या सर्व कांद्याचा लिलाव करा अन्यथा येथून एकही ट्रॅक्टर हलणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने महसूल प्रशासन आणि बाजार समिती प्रशासन यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. त्यातच सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तहसीलदार दोघेही बैठकीसाठी बाहेरगावी असल्याने कनिष्ठ अधिकाऱ्यांना निर्णय घेताना बराच वेळ लागला. पाच तासांच्या आंदोलनानंतर अखेर महसूल प्रशासन, बाजार समितीचे सचिव रवींद्र हिरे आणि व्यापारी यांच्यात चर्चा होऊन तेथेच लिलाव करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब शेवाळे, काशिनाथ गुंजाळ, विनोद खैरनार, रामा पाटील, शशी हिरे, राकेश गुंजाळ, संजय पाटील, सतीश खैरनार, मुन्ना पगार, हेमंत खैरनार, नंदू पवार, तेजस जाधव, रोशन जाधव, ललित पगार, महेंद्र खैरनार, दिपक पवार, राहुल वाघ आदींसह शेतकरी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे, पोलिस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे यांनी चोख पोलिस ठेवला होता.
आमच्या घामाच्या किमतीला कवडीमोल भाव मिळत आहे. नाफेड मात्र चढ्यादराने कांदा विकत आहे. आमचा कांदा संपेपर्यंत नाफेडला बाजारात येऊ देऊ नये आहे.विलास रौंदळ, अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना
कांद्याचे दर पडल्याने आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. प्रशासनाने आमचे ऐकून घेतले नसते तर आंदोलन अधिक तीव्र झाले असते. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. रमेश बच्छाव, कांदा उत्पादक शेतकरी