देवळा (नाशिक) : कांद्याचे भाव सध्या कवडीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच आता कांदा बियाणे टाकण्याचा हंगाम सुरू झाला असून, बियाण्याचे दर गगनाला भिडल्याने शेतकरी हताश झाला आहे.
बाजारात विविध कंपन्यांचे बियाणे 2,700 ते 3,400 रुपये किलो दराने विकले जात असून प्रतिएकरी 2 ते 4 किलो (उगवण क्षमतेनुसार) बियाणे लागते. केवळ बियाण्यांसाठीच शेतकर्यांना मोठा खर्च करावा लागत आहे, असे सावकी येथील कांदा उत्पादक धनंजय बोरसे यांनी सांगितले. परतीच्या पावसाचा धोका असल्याने शेतकरी बियाणे खरेदी करण्यास धजावत नाहीत. आधीच कांद्याचे दर मातीमोल झाल्याने झालेला तोटा आणि त्यात वाढलेले बियाण्यांचे भाव आणि परतीच्या पावसामुळे डाळिंब, कांदा रोप खराब होत असल्याने शेतकरी या दुहेरी - तिहेरी संकटात सापडला गेला आहे. तसेच काही शेतकर्यांनी कांदा बियाणे बोगस निघत असल्याची तक्रारदेखील केली आहे.
कसमादे पट्ट्यात यावर्षी बदलत्या हवामानामुळे कांदा बियाण्याचे उत्पादन कमी प्रमाणात झाले. परिणामी शेतकर्यांना महागात बियाणे विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. मात्र या महागाईमुळे शेतकर्यांची चिंता अधिक वाढली आहे. सध्या काही शेतकर्यांनी कांद्याची रोपे टाकली असताना परतीच्या पावसाचे ढग दाटून येत आहेत. अचानक झालेल्या पावसामुळे रोपे खराब होण्याची भीती शेतकर्यांना सतावत आहे. आधीच कांद्याचे दर कवडीमोल असतानाच बियाण्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. जर रोपे परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त झाली, तर पुन्हा बियाण्यांची मागणी वाढून भाव आणखी वाढतील, अशी भीती शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे. यात लक्ष घालून शासनाने शेतकर्यांना न्याय द्यावा.