लासलगाव (नाशिक) : देशातील कांदा बाजारपेठ सध्या मंदावत असताना शेजारील राष्ट्र पाकिस्तानने २०२५-२६ हंगामासाठी २.७८ दशलक्ष टन कांदा उत्पादनाचे लक्ष्य या निश्चित केले आहे. सिंध, पंजाब, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात व्यापक क्षेत्रात लागवडीची योजना आखण्यात आली आहे. उत्पादनवाढीचा थेट परिणाम भारताच्या बाजारपेठेवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
भारतातील बाजारपेठेला आधीच अतिरिक्त पुरवठा, भावघसरण व निर्यातीतील अडचणींनी मोठा फटका बसला आहे. अशावेळी पाकिस्तानातील उत्पादन वाढल्यास आशियाई देशांत निर्यातीची स्पर्धा तीव्र होऊ शकते. विशेषतः बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ यांसारख्या पारंपरिक भारतीय निर्यात बाजारपेठांत पाकिस्तान स्वस्त दराच्या मदतीने प्रवेश वाढवू पाहात आहे. बांगलादेश सरकारनेही २०२८ पर्यंत कांदा निर्यातीत बाजारपेठ काबीज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी जवळपास ४० टक्क्यांहून अधिक हिस्सा एकट्या बांगलादेशकडून खरेदी होतो. २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४.८० लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केवळ बांगलादेशात झाली होती. त्यातून देशाला १,७२४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते.
बांगलादेश २०२८ पर्यंत कांदा निर्यातीचे लक्ष्य ठेवत असल्याने भारताला कांदा निर्यातीत शेतीला नवनवीन बाजारपेठा शोधाव्या लागणार आहेत. ताज्या स्थितीत भारतात लासलगावसह प्रमुख बाजारांत कांद्याचे दर १,१०० ते १,३०० प्रतिक्विंटल दरम्यान आहेत. पाकिस्तान कमी उत्पादन खर्चामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कमी किमतीत पुरवठा करू शकतो, असा कृषी विश्लेषकांचा अंदाज आहे. त्यामुळे भारताला कांदा निर्यातीत मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे.
शेतकऱ्यांच्या संकटात भर
कांदा उत्पादक शेतकरी आधीच तोट्यात असताना बाहेरील स्पर्धेमुळे निर्यात मंदावणे, दर कमी होणे, साठवणूक खर्च वाढणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते
निर्यात प्रोत्साहनात्मक उपाययोजना वाढवाव्यात, दर्जा आणि प्रक्रिया उद्योग बळकट करावेत, जागतिक बाजारातील संधी वाढवाव्यात, निर्यातीत दीर्घकालीन धोरण आखणे आवश्यक आहे.