Onion News : 'नाफेड'कडून कांदा खरेदी बंद Pudhari
नाशिक

Onion News : उद्दिष्टपूर्ती ! 'नाफेड'कडून कांदा खरेदी बंद

25 केंद्रांवर एक लाख 43 हजार क्विंटल कांद्याची झाली खरेदी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत 'नाफेड' या संस्थेने राज्यातील २५ केंद्रांवर एक लाख ४३ हजार क्विंटल कांद्याची खरेदी केली आहे. यंदा निश्चित केलेली उद्दिष्टपूर्ती झाल्याने आता यापुढे कांदा खरेदी करण्यात येणार नसल्याचे 'नाफेड'ने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारच्या अधिपत्त्याखालील भारतीय राष्ट्रीय सहकारी पणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) या संस्था यंदा तीन लाख टन कांद्याची खरेदी करणार आहेत. यापैकी दीड लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट 'नाफेड'ला दिले आहे. त्यासाठी 'नाफेड'ने राज्यात २५ खरेदी केंद्रे निश्चित केली होती. यापैकी अहिल्यानगर व पुणे येथील केंद्रांशिवाय बहुतांश खरेदी केंद्रे नाशिक जिल्ह्यात होती. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, चांदवड, देवळा, निफाड, दिंडोरी, कळवण आणि नांदगाव येथील केंद्रांवर कांदा खरेदी करण्यात आल्याचे 'नाफेड'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. खरेदीच्या सुरुवातीला दर १,३५० रुपये प्रतिक्विंटल होता. त्यानंतर तो १,१०० रुपये, शेवटी ९५० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी झाली.

बांगलादेशाकडून अडवणूक; कांदा निर्यातीवर परिणाम

'नाफेड'कडून आता कांदा खरेदी होणार नसल्याने, शेतकऱ्यांना कांद्याचे दर वाढण्यासाठी बांगलादेशातील निर्यातीवर अवलंबून राहावे लागेल. मात्र, बांगलादेश सरकारने अचानकपणे भारतीय कांद्याची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. बनावट पद्धतीचा माल पाठविण्यात येत असल्याची शंका तेथील सरकारला वाटू लागल्याने त्यांनी तातडीने ही निर्यात थांबविल्याचे बोलले जाते. स्थानिक व्यापाऱ्यांनी यास दुजोरा दिला आहे. एक-दोन दिवसांत निर्यात पुन्हा सुरळीत होईल, असा विश्‍वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, भारतातून बांगलादेशात पाठविण्यात येणाऱ्या कांद्यासोबत इतरही वस्तूंची निर्यात होत असल्याचा संशय तेथील सरकारला आहे. त्यामुळे सोमवारी (दि. १९) भारतीय कंटनेरची संपूर्ण तपासणी करण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. परिणामी, निर्यात काही काळासाठी ठप्प झाली असून, तपासणी पूर्ण झाल्यानंतर हे कंटेनर रवाना होतील. तसेच श्रीलंका देशाकडून भारतीय कांद्यावर आयातशुल्क लागू करण्यात येणार असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT