लासलगाव (नाशिक) : कर्नाटकहून नवीन कांद्याची हळूहळू आवक सुरू झाल्यामुळे आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि केरळसारख्या दक्षिणेकडील राज्यांत स्थानिक पूरवठा वाढला आहे. परिणामी, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यामुळे कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. दर घसरत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडू लागले आहे.
लासलगाव बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याला किमान ५००, कमाल २१४० तर सरासरी १४५१ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. मात्र शेतकऱ्यांच्या मते, या दरातून उत्पादन खर्चही भरून निघणार नाही. अवकाळी पावसाने यंदा कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून, साठवणूक केलेला कांदाही नैसर्गिक आर्द्रतेमुळे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर्षी रब्बी हंगामात देशभरात कांद्याचे उत्पादन अधिक झाल्यामुळे बाजारपेठांमध्ये साठा वाढला आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून सध्या बाजारात केवळ १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
“भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक ठेवायचे असेल, तर आरओडीटीइपी सवलत १.९ टक्क्यांवर न ठेवता ती किमान ५ टक्क्यांपर्यंत वाढवावी. तसेच निर्यात धोरण हे दीर्घकालीन असले पाहिजे.विकास सिंह, कांदा निर्यातदार, नाशिक
कांदा दरातील चढ-उतार आणि निर्यातीतील अनिश्चिततेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या मिळणाऱ्या दरांतून आमचा खर्चही भरून निघत नाही.संजय गवळी, शेतकरी, खडक माळेगाव
परदेशात कांदा निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ प्रोत्साहन जाहीर करावे. कांद्याचे दर वाढावेत यासाठी झपाट्याने निर्णय घेणे आवश्यक आहे.ललित दरेकर, संचालक, बाजार समिती लासलगाव
वारंवार निर्यात बंदी व निर्बंध लादल्यामुळे भारतीय निर्यातदारांचा सरकारवरील विश्वास ढासळत आहे.निवृत्ती न्याहारकर, शेतकरी, वाहेगाव साळ