जिल्हा उपनिबंधकांच्या अचानक टाकलेल्या धाडीत कांदा खरेदीत नाफेडकडून अनियमितता
बाळासाहेब ठाकरे अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्था या अवसायनात निघालेल्या संस्थेकडून कांदा खरेदी सुरू असल्याचे उघड
नाफेडला नोटीस बजावत जिल्हा उपनिबंधकांचा दणका
खरेदी केलेला कांदा व प्रत्यक्षात चाळीत असलेल्या कांद्याच्या एकूण वजनात मोठी तफावत
नाशिक : केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेंतर्गत नाफेड, एनसीसीएफकडून नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी सुरू आहे. जिल्हा उपनिबंधकांनी अचानक टाकलेल्या धाडीत या खरेदीत नाफेडकडून अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. तर, दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्था या अवसायनात निघालेल्या संस्थेकडून कांदा खरेदी सुरू असल्याचे उघड झाले आहे. यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी नाफेडला नोटीस बजावत दणका दिला आहे
नाफेड व एनसीसीएफमार्फत होणाऱ्या कांदा खरेदीत गैरप्रकार होत असल्यामुळे राज्य शासनाने १८ जुलै २०२५ रोजी शासन निर्णय काढून दक्षता समित्या नेमलेल्या होत्या. या समित्यांनी प्रत्येक सोमवारी आपला अहवाल सादर करावयाचा होता. मात्र वेळेत अहवाल प्राप्त न झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) फैयाज मुलानी यांनी २३ जुलै रोजी पथकासह सिन्नर येथील श्री व्यकटेश एफपीसीएल, मानोरी आणि गणेश ज्योती एफपीसीएल, सुरेगाव या दोन कांदा खरेदी केंद्रांची अचानक तपासणी केली होती. यात शेतकरी उत्पादक कंपन्यांचा काळाबाजार चव्हाट्यावर आला आहे. यात प्रामुख्याने खरेदी केलेला कांदा व प्रत्यक्षात चाळीत असलेल्या कांद्याच्या एकूण वजनात मोठी तफावत आढळली. 40 ते 50 टक्के कांदा 45 एमएमपेक्षा कमी आकाराचा तसेच काजळी लागलेला कमी दर्जाचा आढळून आला आहे. नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केलेला नव्हता, तो नाकारण्यात आला असे सांगण्यात आले तरीही त्याबाबत कागदोपत्री कार्यवाही झालेली नाही. कांद्याचा आकार मोजण्यासाठी प्रतवारी पट्टी आढळून आलेली नाही, शेतकऱ्यांचे सात-बारा उतारे व इतर दस्ताऐवज खरेदी केंद्रावर नव्हते. खरेदी केलेला कांदा ठरवून दिलेल्या दर्जाचा नव्हता तसेच खरेदी प्रक्रियेत अनियमिता दिसली. उपनिबंधकांनी संबधित माहिती जिल्हाधिकारी आणि पणन संचालकांना कळवून पुढील कार्यवाहीची विनंती केली आहे.
नाफेडकडून सुरू असलेल्या कांदा खरेदीच अनियमितता आढळून आलेली असताना दुसरीकडे मात्र, अवसायानात निघालेल्या बाळासाहेब ठाकरे अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्थेकडून सरार्सपणे कांदा खरेदी सुरू असल्याचे निर्देशनास आले. त्यावर जिल्हा उपनिबंधक मुलाणी यांनी नाफेडला नोटीस बजाविली आहे. यात नाफेडने संबंधित संस्थेवर कार्यवाही करून कांदा खरेदी थांबवावी, असे निर्देश दिले आहे. या कार्यवाहीने एकच खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेंतर्गत, नाशिक जिल्ह्यात नाफेड अंतर्गत बाळासाहेब ठाकरे अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्थेकडून कांदा खरेदी सुरू असल्याचे दिसून येत आहे. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 अन्वये नोंदविण्यात आलेली असून सदरची संस्था या कार्यालयाचे कार्यक्षेत्र येते. या संस्थेने या संस्थेच्या मंजूर उपविधीमधील तरतुदीनुसार कामकाज करणे बंधनकारक आहे. मात्र, संस्थेने शासन आदेशाप्रमाणे कामकाज करत नसल्याने 31 डिसेंबर 2024 रोजी सदर संस्था ही अवसायानात काढली असून त्याबाबतचे आदेश देखील काढले आहे. या संस्थेवर प्रशासक नियुक्त केलेले आहे. असे असतानाही या संस्थेकडून कांदा खरेदी केंद्रासाठी नोंदणी करून कांदा खरेदीसाठी तिची नियुक्ती केली. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या संस्थेवर तत्काळ कार्यवाही करून संस्थेचे कांदा खरेदी केंद्रावरील कांदा खरेदी व अनुषंगिक कामकाज तत्काळ थांबवावे, असे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी काढलेल्या नोटीसीत दिले आहे.