मालेगाव ( नाशिक ): तालुक्यातील मका व कांदा उत्पादक शेतकरी अत्यल्प बाजारभावामुळे आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे मक्याची हमीभावाने खरेदी व भावांतर भरपाई योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी (दि. 29) सकाळी काटवन परिसरात शेतकर्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला.
खत बियाणे, मजुरी, सिंचन आणि वाहतूक खर्च प्रचंड वाढला असूनही मक्याला व कांद्याला मिळणारे अत्यल्प दर शेतकर्यांना अक्षरशः कोलमडून टाकत आहेत. अनेकांचे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेकडो शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या देत शासनाचे लक्ष वेधले. मक्याला हमीभाव द्या, कांदा उत्पादकांना तात्काळ अनुदान द्या, शेतकरी वाचवा - देश वाचवा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, महसूल प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत शेतकरी प्रतिनिधींना भेटून त्यांचे निवेदन स्वीकारले. निवेदनात मक्याची हमीभाव खरेदी तात्काळ सुरू करावी, भावांतर भरपाई योजना लागू करावी, 2025 मध्ये 1500 रुपयांपेक्षा कमी दराने कांदा विकणार्या शेतकर्यांना 1000 रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे आणि थेट डीबीटीद्वारे मदत जमा करावी अशा महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या. प्रशासनाने मागण्या शासनाकडे तातडीने पाठविण्याचे आश्वासन दिले. शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकर्यांनी यावेळी दिला.
आंदोलनात सागर भामरे यांच्या नेतृत्वाखाली कैलास कापडणीस, धनंजय कापडणीस, मोहन जाधव, सोनू शिरसाठ, वासुदेव बोरसे, पिंटू सूर्यवंशी, बाजीराव कापडणीस, बाळू शिरसाठ, गणेश बोरसे, प्रविण कदम, विजू देवरे, सचिन भामरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तालुक्यातील शेतकरी आज जीवाच्या कड्यावर उभे आहेत. मका आणि कांद्याचे दर कोसळल्याने शेतकर्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. वाढलेला खर्च, कमी भाव आणि कर्जाचा बोजा अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. त्यामुळे हमीभाव खरेदी व भावांतर भरपाई तात्काळ सुरू करावी अन्यथा आंदोलन तीव्र करू.सागर भामरे, शेतकरी, कजवाडे