लासलगाव : भारतीय कांद्याला चालना मिळाली असून, लासलगाव येथून श्रीलंकेसाठी कांद्याने भरलेला कंटेनर नुकताच रवाना झाला आहे. सद्यस्थितीला लाल कांद्याची आवक बघता भारताने निर्यात शुल्क 20 टक्के घट होऊन शून्य टक्के केल्यास परदेशात भारतीय कांद्याला चांगली मागणी मिळू शकते.
बांगलादेशाने 17 नोव्हेंबरला कांद्यावर प्रतिकिलो 10 टका (श्रीलंकन चलन) कमी केले. तर श्रीलंका सरकारने दहा नोव्हेंबरच्या नोटिफिकेशनद्वारे १ डिसेंबरपासून 30 रुपये प्रतिकिलोवरून दहा रुपये प्रतिकिलो आयात शुल्क केला आहे. त्यामुळे भारतीय कांद्याला परदेशात चांगली मागणी मिळणार आहे. यामुळे लासलगाव कांदानगरीतून बांगलादेश श्रीलंकासह दुबई, अरब राष्ट्र, मलेशिया यांच्यासह इतर देशांत मागणी वाढणार आहे. त्यासाठी भारत सरकारने निर्यात शुल्क हटवून शून्य टक्के केल्यास याचा फायदा शेतकरी व निर्यातदार यांना होणार आहे.
श्रीलंका व बांगलादेशाने निर्यात शुल्क कमी केल्याने भारतीय कांद्याला चांगली मागणी मिळत आहे. पण इतर देशांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी केंद्र सरकारने लादलेला 20 टक्के निर्यात शुल्क असून, तो तात्काळ कमी केल्यास भारतीय शेतकरी व निर्यातदार यांना त्याचा फायदा होणार आहे.- प्रवीण कदम, कांदा निर्यातदार, लासलगाव