लासलगाव : देशांतर्गत बाजार समितीमध्ये नवीन लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने बाजारभावात घसरण सुरू आहे. गुरुवारच्या तुलनेत शनिवारी (दि. 14) दोन दिवसांत कमाल बाजारभावात 1,500 रुपयांची, तर सरासरी बाजारभावात 1 हजार रुपयांची मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक दुपटीने वाढली आहे. परिणामी, कांद्याची लाली एका आठवड्यात उतरली असून, भाव प्रतिक्विंटल हजार रुपयांनी कमी झाला आहे.
लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील तसेच अहिल्यानगर, पुणे, चाकण, सोलापूर यांसह देशांतर्गत असलेल्या बाजार समित्यांमध्ये मागणीच्या तुलनेत नव्याने येत असलेल्या लाल कांद्याची आवक अधिक आहे. त्यामुळे गुरुवार (दि.12) च्या तुलनेत शनिवारी (दि.14) दोन दिवसांत टप्प्याटप्प्याने कमाल बाजारभावरात 1,500. तर सरासरी बाजारभावात 1,000 रुपयांची घसरण झाली. सद्यस्थितीत लाल कांद्याला दोन ते अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळत आहे.
गेल्या आठवड्यात साडेतीन ते चार हजार रुपयांनी लाल कांद्याची विक्री सुरू होती. आवकही मर्यादित प्रमाणात असल्यामुळे कांद्याचे दर टिकून होते. एका आठवड्यात लाल कांद्याची आवक दुपटीने वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे. लाल कांद्याची साठवण क्षमता फार कमी असते. त्यामुळे काढणीनंतर लगेच शेतकरी कांदा बाजार समितीत विक्रीसाठी बाजारात आणत आहेत.
लासलगाव बाजार समितीत 1,434 वाहनांद्वारे 23 हजार 795 क्विंटल कांद्याची आवक होऊन लाल कांद्याला किमान 1,100 कमाल 3,641 सरासरी 2,700 प्रतिक्विंटल भाव मिळाला. नाशिक जिल्ह्यातील तसेच अहिल्यानगर, पुणे, चाकण, सोलापूर यांसह देशांतर्गत असलेल्या बाजार समित्यांमध्ये मागणीच्या तुलनेत नव्याने येत असलेल्या लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्यामुळे बाजारभावात घसरण दिसत आहे.नरेंद वाढवणे, सचिव, लासलगाव बाजार समिती, नाशिक.
कांद्यावर अजूनही २० टक्के निर्यातशुल्क कायम आहे. त्यामुळे कांदा निर्यातीला अडथळा निर्माण झाला आहे. निर्यात खुली केल्यास कांद्याचे दर टिकून राहण्यास मदत होईल. श्रीलंकेने आयातशुल्कात २० टक्के कपात केल्यामुळे नाशिकचा कांदा निर्यात होण्यास सुरुवात झाली आहे.निवृत्ती न्याहारकर, शेतकरी, नाशिक.