वीर दाजिबा बाशिंग मिरवणूक File Photo
नाशिक

पत्नीच्या शोधात फिरतो नवरदेव, नाशिकमध्ये धुलिवंदनाची अनोखी परंपरा

Veer Dajiba Miravnuk Nashik | शहरात निघते वीर दाजिबा बाशिंग मिरवणूक

गणेश सोनवणे

गणेश सोनवणे, नाशिक

पुढारी ऑनलाइन डेस्क | होळीच्या दुसऱ्या दिवशी देशभर धुळवड साजरी केली जाते, मात्र धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला वीर दाजिबा मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. तब्बल तीनशे वर्षांपासूनची ही परंपरा आहे. दाजीबा नवसाला पावणारा देव मानला जातो. यावेळी अंगाला हळद लावून डोक्यावर देवाचा मुकुट घेत बाशिंग बांधून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या शोधात नवरदेव फिरतो. नेमकी काय आहे ही परंपरा ते जाणून घेऊया..

होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलिवंदनला नाशिक शहरातील विविध भागातून वीर नाचवले जातात. दाजीबा वीर मानाचा असल्याने दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणांहून भाविक येतात. खास करुन विवाह इच्छुक मुला-मुलींचे विवाह जमत नसतील अशांनी या वीराला बाशिंग वाहण्याची परंपरा आहे. या वीराला बाशिंग वाहिल्यानंतर अविवाहित मुला-मुलींची लग्न जमतात असाही समज आहे. या पारंपारिक मिरवणुकीमागे आख्यायिका अशी आहे, की हळद लागलेल्या नवरदेवाला मृत्यू आला आणि त्याची लग्नाची इच्छा अपूर्णच राहिली. यामुळे डोक्यावर देवाचा मुकूट अन् बाशिंग बांधून अंगाला हळद लावून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या शोधात नवरदेव फिरतो. शहरात ठिकठिकाणी महिला या वीरांचं मनोभावे औक्षण करतात. या परंपरेनुसार दाजीबा वीर सर्वांचे विघ्न दूर करतो असा समज आहे.

दाजीबा वीराचे दरवर्षी मानकरी ठरलेले असतात. त्यांना पारंपारिक पोशाखात सजविण्यात येते. डोक्याला भरजरी वस्त्रे, कानात सोन्याच्या पगड्या, हातात सोन्याचे कडे, पायात जोडा असा वेश धारण करून वाजत गाजत या वीर दाजीबाची मिरवणूक निघते. या पारंपारिक मिरवणुकीने नाशिकमधील वातावरण भक्तीमय होत असते. घरासमोर रांगोळी काढत तसेच ठिकठिकाणी औक्षण करत या दाजिबांचे स्वागत केले जाते, दाजिबांवर फुलांचा वर्षावही केला जातो. हे दाजीबा नवसाला पावणारे असून त्यांचे दर्शन घेतल्याने सर्व दुःख दूर होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे. जून्या नाशकातील बेलगावकर घराण्याला हा मान देण्यात आलाय. जुन्या नाशिकमधून या मिरवणुकीला सुरुवात होऊन जूनी तांबट लेन, रविवार पेठ मार्गे गंगाघाटावरून परत जुन्या नाशिकमध्ये या मिरवणुकीचा शेवट होतो.

दाजिबा बाशिंगे वीराला देवाचे वस्त्र परिधान केले जातो. नंतर त्याच्या डोक्यावर देवाचा मुकुट चढविला जातो आणि बाशिंग बांधले जाते. डोक्यावरील मुकुट आणि बाशिंग दोरखंडाच्या सहाय्याने कमरेच्या भोवती बांधलेले असते. दोन्ही हातांच्या मनगटांना आणि गळ्यात फुलांच्या माळा बांधतात. तसेच, अंगाला नवरदेवाप्रमाणेच हळद लावण्यात आलेली असते.

तळोदा येथे बाशिंगे वीराची समाधी

आख्यायिकेनुसार हळदीचा नवरदेव बाशिंग लावून दरवर्षी उपवर पत्नीच्या शोधात फिरत असतो. हळद लागलेल्या नवरदेवाची लग्नाची इच्छा अपूर्ण राहिली, त्यामुळे अंगाला हळद लावून डोक्यावर देवाचा मुकुट घेत बाशिंग बांधून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या शोधात नवरदेव फिरतो, लग्न मंडपात गेल्यावर दाजी म्हणून त्यांना 'दाजीबा वीर' तर हळद लावल्यावर बाशिंगे लावून मिरवतात म्हणून 'बाशिंगे वीर' असा प्रघात आहे. या बाशिंगे वीराची समाधी दिंडोरी येथील तळोदा येथे असून होळीच्या दिवशी याठिकाणी रात्री पूजा केली जात असल्याची आख्यायिका आहे. हा दिवस फाल्गुन वद्य प्रतिपदेचा असल्याने या दिवसापासून 'दाजिबा वीराची' मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT