जुने नाशिक : नदीम शेख
स्मार्ट सिटी प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा नाशिककरांच्या मनात अनेक आशा होत्या. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला जुना नाशिक या प्रकल्पातून सर्वप्रथम उजळून निघेल, अशी अपेक्षा होती. पण वास्तवात चित्र पूर्णपणे वेगळे असून, गावठाण पुनर्विकास योजनेतील तोडकीमोडकी कामे वगळता जुने नाशिकच्या समस्या कायम राहिल्या असून, या परिसराचा विकास दिवास्वप्नच ठरला आहे.
जुने नाशिक परिसरातील भद्रकाली परिसर आणि महात्मा फुले मार्केट आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. नवी दुकाने सुरू होण्याची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा, दयनीय अवस्थेत असलेले मटण मार्केट, घाणीने व्यापलेली मंडई आणि निष्क्रिय शौचालये ही स्मार्ट सिटीच्या वचनांची थट्टा आहे. चौकमंडईतील फाउंटनही वर्षानुवर्षे शुभेच्छांची वाटच पाहत आहे
रस्ते आणि वाहतुकीचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. द्वारका, शालिमार, गोल्फ क्लब, वडाळा, मुंबई नाका या सर्व ठिकाणी दररोज ट्रॅफिक जाम होतो. सारडा सर्कल परिसरात शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. खड्डे, अपुरे रस्ते, गोंधळलेली वाहतूक हेच स्मार्ट सिटीचे वास्तव आहे का?, असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजाही वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. स्कायवॉक वा भुयारी मार्ग कधी होणार, असा प्रश्न आता शाळकरी मुले करत आहेत. सारडा सर्कलचा आकार कमी करण्याची मागणी वारंवार होऊनही त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. जुने नाशकात डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय असले तरी आधुनिक तंत्रज्ञान, सुविधा यांचा अभाव स्पष्ट जाणवतो. मुळात जुन्या नाशिकपासून स्मार्ट सिटीच्या कामांची सुरुवात व्हायला हवी हाती. कारण हेच शहराचं मूळ आहे, इथूनच विकासाचा पाया भक्कम व्हायला हवा होता. पण आज नागरिकांच्या मूलभूत गरजाच पूर्ण झालेल्या नाहीत. प्रशासनाने केवळ योजना मांडून थांबू नये, तर तातडीने प्रत्यक्ष उपाययोजना करून जुना नाशिक खऱ्या अर्थाने स्मार्ट करण्यासाठी पुढे यावं, अशी अपेक्षा प्रत्येक नाशिककराची आहे.
महात्मा फुले मार्केट, भद्रकाली मार्केट परिसराचे नूतनीकरण प्रलंबित आहे. उद्याने, रस्ते, वाहतुकीचा प्रश्न कायम आहे. नदीघाटाचे हेरिटेज संवर्धन, सारडा सर्कल येथे स्कायवॉक, नागरिकांना सुविधा मिळू शकलेल्या नाहीत.तौसिफ शेख, प्राचार्य, नॅशनल कॉलेज
पाणी, रस्ते, ड्रेनेज यासारख्या मूलभूत सुविधांसाठी जुने नाशिककर आजही झगडत आहेत. गंजमाळ, द्वारका सारख्या भागात बकालावस्था निर्माण झाली आहे. नागरिकांना विकसित नाशिकच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.ॲड. बाबा सय्यद, नागरिक
स्मार्ट सिटीच्या कामांचा बोजवारा उडाला आहे. गावठाण विकास योजनेचा मूळ उद्देश हिरावला आहे. महापालिकेचे नागरी समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. सर्वसमावेशक विकासाची प्रतीक्षा आहे.राजेंद्र बागूल, राजकीय नेते