नाशिक : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्यसरकार उभे आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार सकारात्मक असून एक- दोन दिवसांत अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीबाबत आंतम निर्णय होणार असल्याची माहिती जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करत असून स्वयंसेवी संस्थांसह सीएसआर अंतर्गत कंपन्यांनीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही महाजन यांनी केले.
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची महाजन यांनी सोमवारी (दि. २९) पाहणी केली. यावेळी बोलताना महाजन यांनी अतिवृष्टीमुळे राज्यात मोठे नुकसान झाले असून जमिनीही वाहून गेल्या आहेत. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सह सर्व मंत्री राज्यात पाहणी करत आहेत. ज्यांच्या जनावरांची नोंद नाही तेथे तिथल्या प्रतिष्ठित लोकांनी सांगितले तरीही त्यांना मदत केली जाईल, असेही महाजन यांनी सांगितले. गोदावरीचा पूर आता ओसरला आहे. मी काल रात्रीपासून पाहणी करत असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासन चोवीस तास अलर्ट राहून मदत करत आहेत. नागरिकांनी सुचनांचे पालन केल्याने मोठी जीवित हानी झाली नसल्याचा दावा महाजन यांनी यावेळी केला.
ठाकरेंनी मेळाव्याचा खर्च पुरग्रस्तांना द्यावा
उध्दव ठाकरे यांनी पूरग्रस्तांवरून सरकारवर टिका करण्यापेक्षा दसरा मेळावा रद्द करून मेळाव्याचे पैसे पूरग्रस्तांना द्यावेत,असा टोला महाजन यांनी लगावला. ठाकरे पुरस्थिती बघण्यासाठी आलेत, तिथे रेड कार्पेट टाकले होते. त्यांबाबत माझ्याकडे व्हीडीओ असल्याचा दावाही महाजन यांनी केला. मुंबईत कोणाचा महापौर होणार हे आधी मनसे आणि शिवसेना यांनी ठरवावे असे सांगत, घोडा मैदान जवळ असल्याचे महाजन म्हणाले.
गुन्हेगारीबाबत बैठक घेणार
नाशिक शहर शांत असून इथे गुन्हेगारीला थारा नाही असे सांगत, शहरातील गुन्हेगारी संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले. नाशिकसह इतर ठिकाणी कॉलसेंटरवर पडलेल्या छाप्याबद्दल काय चौकशी सुरू आहे. यात कोण कोण अडकले माहिती असली तरी, याबाबतची माहिती गृहखात्याकडे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.