OBC Reservation / ओबीसी आरक्षण Pudhari News Network
नाशिक

OBC Maha Melava : बीड येथील ओबीसींचा महामेळावा स्थगित

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे मंत्री भुजबळ यांच्याकडून आवाहन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : ओबीसी आरक्षणासंदर्भात ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने रविवारी (दि. २८) बीड येथे महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रथम शेतकऱ्यांना मदत व्हावी यादृष्टीने हा महामेळावा काही कालावधीसाठी स्थगित करण्यात करण्यात येत आहे, अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मंत्री भुजबळ यांनी याबाबत व्हिडिओद्वारे ओबीसी बांधवांना माहिती दिली आहे. तसेच प्रथमतः अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सकल ओबीसी समाज बांधवांना केले आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्याकडून बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर रविवारी हा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केले. या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण संपले या भीतीने राज्यभरातील १४/१५ तरुणांनी आपले जीवन संपविले. याबाबत ओबीसी बांधवांना योग्य माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. परंतु राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि विशेषत: बीड शहर व जिल्ह्यामध्ये झालेली अतिवृष्टी तसेच शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसानीमुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला असून, मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे.

अतिवृष्टीमुळे जे शेतकरी अडचणीत आले आहेत त्यांना मदत करा, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. शेवटी शेतकरी जगला, तरच हे जग जगणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांसाठी मदत करू या.
छगन भुजबळ, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT