दातली (सिन्नर, नाशिक): सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे गुरुवारी ग्रामपंचायत कर्मचारी वसुलीचे काम करत असताना नायलॉन मांजाने दोन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. विकी पोपट जाधव व शिवशंकर खामकर अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे असून दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीचे करवसुलीचे काम सुरु असताना अचानक मुसळगाव फाट्यावर लोंबकळत असलेल्या नायलॉन मांजाने कर्मचार्यांच्या भुवईजवळ व हाताला खोल जखमा केल्या. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने मदत करून जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात तातडीने दाखल केले आहे.
प्रशासनाची कारवाई पुरेशी
यापूर्वी सिन्नर शहरात दोन-तीन दिवसांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती. त्या घटनेनंतर सिन्नर पोलीस व नगरपरिषद प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त केला होता. जप्ती मोहिमेमुळे काही काळ वापरात अंशतः घट झाली असली तरी, पुन्हा अशा घटना घडू लागल्याने प्रशासनाची कारवाई पुरेशी ठरत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत नायलॉन मांजा विक्री व वापरावर पूर्ण बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. तर सुरक्षा दृष्टीने संबंधित विभागांनी अधिक कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.