सिन्नर (नाशिक) : मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण आणि सजीवांना गंभीर धोका निर्माण करणार्या तसेच शासनाने पूर्णतः बंदी घातलेल्या नायलॉन मांजाच्या विक्री, साठा व वापर यावर नियंत्रण आणण्यासाठी सिन्नर पोलिसांनी मोठी मोहीम राबवली.
त्यात 9 लाख 40 हजार 800 रुपये किमतीचा साठा जप्त केला असून, एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. नायलॉन मांजामुळे नागरिक, पक्षी व प्राण्यांना होणार्या जखमांच्या तक्रारींना अनुसरून पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. शनिवारी (दि.29) पोलिस निरीक्षक हेंतकुमार भामरे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मनेगाव शिवारातील भाटजिरे मळ्यातील एका शेडमध्ये नायलॉन मांजाचा साठा लपवून ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे यांच्या पथकास छाप्यासाठी रवाना करण्यात आले. छापा टाकताच शंकर ऊर्फ आशुतोष राजेंद्र शिंदे (27, रा. सुतार गल्ली, सिन्नर) हा व्यक्ती साठ्यासह आढळला. त्याच्या ताब्यात मोनो केटीसी, हिरो प्लस, मोनो फिल गोल्ड आदी कंपन्यांचे एकूण 19 बॉक्समधील 11 हजार 904 रिळे किंमत 9 लाख 40 हजार 800 असा मुद्देाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संपूर्ण कारवाई पोलिस निरीक्षक हेंतकुमार भामरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने केली. हवालदार हेंत तांबडे पुढील तपास करीत आहेत.
नागरिकांना आवाहन
सिन्नर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नायलॉन मांजाची चोरट्या पद्धतीने विक्री किंवा खरेदी होत असल्याची माहिती तत्काळ पोलिसांना कळवावी. माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.