येवला (नाशिक) : शहरात नायलॉन मांजाचा वापर कोणीही नये, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी केले आहे. शहरातील नागड दरवाजा परिसरात छापा घालून इमरान इकबाल शेख यास १८ नायलॉन मांजाच्या रीळसह ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
नायलॉन मांजामुळे नागरिक, बालक, दुचाकीस्वार, पक्षी तसेच जनावरांच्या जीविताला धोका निर्माण होतो. अनेक अपघात व गंभीर दुखापतींच्या घटना समोर येत आहेत. हा धोका लक्षात घेता नायलॉन मांजाचा वापर पूर्णतः बंद करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी सांगितले. नायलॉन मांजावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. त्याची विक्री, साठवणूक तसेच वापर करणे हा गुन्हा आहे. तरीही काही ठिकाणी बेकायदेशीररित्या मांजाची विक्री होत आहे. यामुळे अनेक दुचाकीस्वारांना गंभीर जखमा झाल्या आहेत. यासह अनेक पक्षी जखमी झाले आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिक, दुकानदार, पतंग विक्रेते व पालकांनी याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन केले आहे. शहरात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी दिला. नगरपरिषद, पोलीस प्रशासन व संबंधित विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
नागरिकांनी स्वतःची व इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन नायलॉन मांजाचा वापर टाळत प्रशासनास सहकार्य करावे. कोणत्याही ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे आढळल्यास नगरपरिषद किंवा पोलिसांना कळवावे.तुषार आहेर, मुख्याधिकारी, येवला नगरपरिषद
नायलॉन मांजाचा वापर व विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करणार आहे. पतंग खेळताना नायलॉन मांजा आढळला तर १८ वर्षाच्या मुलांवर कार्यवाही होईल. लहान मुलाकडे नायलॉन मांजा आढळला तर त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाईल.अनिल भवारी, पोलिस निरीक्षक, येवला शहर