लासलगाव ( नाशिक ): बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे ३० वर्षीय तरुण अक्षय नहाटा याच्या चेहऱ्याला गंभीर जखमी होऊन २१ टाके पडले. उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घातलेली असतानाही लासलगावात बंदी कागदावरच असल्याचे दिसून आले.
दत्त मंदिराजवळून दुचाकीवरून जात असताना नायलॉन मांजा अक्षय नहाटाच्या तोंडाजवळ अडकला. त्यामुळे काही क्षणांतच त्याचा गाल कापला गेला आणि रक्तबंबाळ झाला. जखम शिवण्यासाठी डॉक्टरांनी २१ टाके घातले.
पोलिसांनी तातडीने विशेष मोहीम राबवत नायलॉन मांजाची विक्री थांबवावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.डॉ. योगेश चांडक, लासलगाव
नायलॉन मांजाची खुलेआम विक्री, साठवणूक आणि वापर सुरू असताना लासलगाव पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नागरिक जखमी होत असताना, पक्षी मृत्युमुखी पडत असताना पोलिस काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.