नाशिक : कामगारांना सन्मान मिळावा, त्यांच्या पदाचा दर्जा राखला जावा यासाठी काही व्यवसायाच्या नावात बदल केले जाणार आहेत. त्यानुसार, आता 'प्लंबर'चा 'वॉटर इंजिनिअर' असा उल्लेख केला जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केला.
मंत्री लोढा शुक्रवारी (दि. ३०) नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्लंबरचा दर्जा बदलून वॉटर इंजिनिअर असा सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल. मजुरांना सन्मान मिळावा यासाठी काही व्यवसायांच्या नावात बदल केला जाणार असल्याचेही लोढा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याप्रसंगी त्यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बूथ समिती, बूथ रचना या सगळ्याचा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेत, शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांना सूचना केल्या. दरम्यान, काँग्रेस खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी मंत्री लोढा यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार डॉ. बच्छाव म्हणाल्या, मंत्री लोढा नाशिकमध्ये येणार असल्याचे समजताच त्यांना संपर्क साधला. त्यांचा दौरा व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, एखाद्या कार्यक्रमात भेटू असे ते म्हणाले. त्यानुसार दुपारी २ च्या सुमारास निमामध्ये आयोजित इंडस्ट्रियल मिट कार्यक्रमात भेटण्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांची भेट घेतल्याचे खासदार डॉ. बच्छाव यांनी स्पष्ट केले.
कौशल्याचे तंत्र अन् धडे देणाऱ्या आपल्या विभागाकडून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना बोलण्याचे धडे देणार काय, असा प्रश्न विचारला असता, त्यावर लोढा यांनी चुप्पी साधणे पसंत केले. 'मी २९ वर्षांपासून आमदार आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून मंत्री झालो आहे. मला मंत्री राहू द्या.' असे म्हणत त्यांनी मंत्री कोकाटे यांच्या प्रश्नाला बगल दिली.