Notices to 26 hospitals for non-fulfillment of documents
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका क्षेत्रातील ६०२ रुग्णालये, नर्सिंग होम, शुश्रूषागृहांच्या परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे. मार्च २०२५ अखेर नोंदणी व नूतनीकरणाची मुदत संपलेल्या ८८ पैकी ४५ रुग्णालयांनी परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तीन रुग्णालयांची कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे त्यांची नोंदणी स्थगित करत कागदपत्रे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे, तर कागदपत्रे अपूर्ण असणाऱ्या २६ रुग्णालयांना वैद्यकीय विभागातर्फे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट १९४९ अंतर्गत महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी (सुधारित) नियम २०२१ नुसार महापालिका हद्दीतील सर्व खासगी रुग्णालयांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करणे तसेच दर तीन वर्षांनी परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक केले आहे. रुग्णालय नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे यापूर्वी ऑफलाइन अर्ज सादर केले जात होते.
मात्र, त्यात अनागोंदी समोर आल्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी रुग्णालय नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून, ते १५ एप्रिलपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या नोंदणी त्यात व नूतनीकरणासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे या संकेतस्थळावर अपलोड करण्याची जबाबदारी संबंधित नर्सिंग होम, हॉस्पिटल मालक, संचालकांची असेल.
वैद्यकीय विभागाकडून कागदपत्रांची ऑनलाइन तपासणी होईल. काही त्रुटी असल्यास संबंधितांना ऑनलाइन माहिती दिली जाईल. प्रस्ताव परिपूर्ण असल्यास महापालिकेची फी चलनाद्वारे भरल्यानंतर नोंदणी, नूतनीकरण प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहे. दरम्यान, ६०२ रुग्णालयांपैकी ८८ रुग्णालयांची मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत असून, ४५ रुग्णालयांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यामुळे त्यांना परवानगी देण्यात आली आहे. २६ रुग्णालयांच्या कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे त्यांना सात दिवसांमध्ये आवश्यक पूर्तता करावी, अशा आशयाच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. २२ प्रस्तावांची छाननी सुरू असल्याची माहिती सहायक वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी दिली.
परवाना नोंदणी व नूतनीकरण प्रक्रियेसाठी रुग्णालयांना प्रक्षण नियंत्रण मंडळ, अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखले घेणे आवश्यक आहे. या दाखल्यांसाठी सध्या रुग्णालयांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. घरपट्टी, पाणीपट्टी तसेच जागा मालकीसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे.