राज्य मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर महाराष्ट्राला सात मंत्रिपदे लाभली आहेत. file
नाशिक

उत्तर महाराष्ट्राला मंत्रिपदाचे सप्तर्षी

Maharashtra Cabinet Expansion | नाशिक, जळगावला प्रत्येकी तीन मंत्रिपदे; धुळ्यालाही स्थान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर महाराष्ट्राला सात मंत्रिपदे लाभली आहेत. नाशिक व जळगाव जिल्ह्यातून प्रत्येकी तीन, तर धुळे जिल्ह्यातून एकाला मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. नंदुरबारची पाटी मात्र कोरीच राहिली आहे. नाशिक जिल्ह्यातून शिवसेनेचे दादा भुसे तर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून नरहरी झिरवाळ आणि ॲड. माणिकराव कोकाटे यांना संधी मिळाली आहे. जळगावमधून भाजपचे गिरीश महाजन, संजय सावकरे व शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना तसेच धुळ्यातून जयकुमार रावल यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. या विस्तारात विशेषतः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, अनिल पाटील तसेच भाजपचे विजयकुमार गावित यांना डच्चू मिळाला आहे.

बहुप्रतीक्षेत असलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात यंदा उत्तर महाराष्ट्रात महायुतीतील तिन्ही घटक पक्षांकडून मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू होती. अखेर रविवारी (दि.१५) झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ७ मंत्रिपदे पदरात पडली. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेने दादा भुसे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना मंत्रिपदी विराजमान केले आहे. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसने धक्कातंत्र वापरत भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवतानाच ॲड. कोकाटे व झिरवाळ या दोन नवीन चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. त्याचवेळी ५ आमदार असलेल्या भाजपने मात्र एकाही सदस्याला संधी दिली नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

ज्येष्ठ नेते भुजबळांना डावलले

१९९९ पासून राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचा कारभार करणारे ज्येष्ठ नेते भुजबळ यांचा मंत्रिमंडळात प्रवेश निश्चित मानला जात होता. मात्र, अजित पवार यांनी भाकरी फिरविताना यंदा नवीन चेहऱ्यांना संधी दिली. भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यामागे त्यांच्या वयाचा अनुमान लावला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात भुजबळ यांना दूर ठेवण्यात भाजपचे दबावतंत्र असल्याची चर्चा राजकीय गोटात रंगू लागली आहे. दरम्यान, भुजबळ समर्थकांमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने तीव्र नाराजीचा सूर पसरला आहे.

भाजपने नाशिकला पुन्हा पुसली पाने

२०१४ पासून नाशिक जिल्ह्याने भाजपला भरभरून साथ दिली आहे. सलग तीन निवडणुकांमध्ये नाशिक शहरातील तिन्ही जागांसह चांदवड-देवळा मतदारसंघही पक्षाच्या झोळीत टाकला. तर बागलाणमध्ये सलग दुसऱ्यांदा पक्षाचा उमेदवार विक्रमी मतांनी विजयी झाला. निवडणुकीच्या निकालानंतर नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, चांदवडचे आमदार डाॅ. राहुल आहेर यांची नावे पक्षांतर्गत चर्चेत होती. प्रत्यक्षात विस्तारावेळी भाजपने नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे भाजपच्या सापत्न भूमिकेविरोधात नाशिकरांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT