एका दिवसात घटले ७ अंश तापमान (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक

North Maharashtra Cold Wave Nashik|उत्तर महाराष्ट्र गारठला; नाशिककरांना हुडहुडी

एका दिवसात घटले ७ अंश तापमान

पुढारी वृत्तसेवा

निफाड ६.५ अंश सेल्सि.

धुळे ६.३ अंश सेल्सि.

जळगाव ८ अंश सेल्सि.

नाशिक १० अंश सेल्सि.

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून, शुक्रवारी (दि. २०) पहाटे अनेक भागांतील किमान तापमानात मोठी घसरण नोंदवण्यात आली. निफाड आणि धुळे परिसरात पारा ७ अंशांच्या खाली घसरल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. नाशिक शहरात १० अंश सेल्सिअस, जळगावमध्ये ८ अंश तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, अवघ्या एका दिवसात निफाडच्या तापमानात मोठी घसरण झाल्याने द्राक्ष उत्पादक पट्टयातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील थंडीची तीव्रता वेगवेगळ्या भागांत जाणवत आहे. धुळे येथे ६.३ अंश, निफाड येथे ६.५ अंश, जळगाव येथे ८ अंश आणि नाशिकमध्ये १० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले. नंदुरबारसाठी हवामान विभागाच्या २० नोव्हेंबरच्या अंदाजात १५.६ अंश किमान तापमान नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, निफाडमध्ये गुरुवारी (दि. १९) १३.९ अंश तापमान होते. त्यात एका दिवसात ७.४ अंशांची घट होऊन शुक्रवारी पारा ६.५ अंशांवर आला. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही निफाड आणि धुळे येथे कमी तापमान नोंदविले गेले.

द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ

उत्तर भारतातून वाहणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामानात बदल जाणवत आहेत, पहाटे आणि रात्री थंडीचा जोर अधिक असून, दुपारी मात्र उन्हाचा चटका जाणवत आहे. तापमानातील या विषम बदलामुळे नागरिकांना सकाळी उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

या थंडीचा शेतीवरही संमिश्र परिणाम होण्याची शक्यता आहे. कांदा, गहू, ज्वारी आणि हरभरा वासारख्या रब्बी पिकांसाठी थंड वातावरण पोषक ठरू शकते. मात्र, निफाडमधील द्राक्षबागांत तापमानातील अचानक घसरण आणि दवबिंदूमुळे उत्पादकांची चिंता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT