नाशिक : मविप्रच्या राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनमध्ये सुरू करण्यात आलेल्या सीआयआय मॉडेल करिअर सेंटरचा विद्यार्थ्यांना नोकरीच्या दृशीने मोठा फायदा होणार आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत कौन्सिलिंग, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटसाठीची माहिती दिली जाणार असून, त्यांना नाशिकसह देशभरातील इतर नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
मविप्रच्या गंगापूर रोडवरील राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये सीआयआय मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.१०) आयोजित (मेगा जॉब फेअर) रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्यामध्ये ३० कंपन्याचे जवळजवळ ५,००० जॉब ओपनिंग आणि १,८०० विद्यार्थ्यांचे या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यात आले. अॅड.ठाकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सदर कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी मविप्र संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रमोद अहिरराव, सीआयआयचे महाराष्ट्र हेड विनायक इक्के, दयाल कांगणे व त्यांची संपूर्ण टीम आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पाटील, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. सुशांत आहेर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम नियोजनासाठी परिश्रम घेतले. प्रा. भूषण देशमुख यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
रोजगार मेळावा यशस्वीतेसाठी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी तसेच सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य आणि शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.