Nashik Simhastha Kumbh Mela  
नाशिक

Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही; नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडक इशारा

Nashik Simhastha Kumbh Mela | स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे मार्गाचे भूमिपूजन उत्साहात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा महाराष्ट्राचा अभिमान आहे. या कुंभमेळ्याच्या माध्यमातून रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शासनाने प्रथमच ३५ हजार कोटींचा निधी दिला आहे.

ही सिंहस्थ कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने व्हावीत. कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, निकृष्ट कामे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

सिंहस्थ हा श्रद्धेचा, अस्मितेचा विषय आहे, त्यात सत्ताधारी-विरोधक असा भेद बाळगता कामा नये, असे नमूद करत सिंहस्थ यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यायला हवी, अशा शब्दांत सिंहस्थ कामांवर टीका करणाऱ्या विरोधकांचाही शिंदे यांनी समाचार घेतला.

उपमहापौर विलास शिंदे यांच्या पाठपुराव्यातून साकार होणाऱ्या 'स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे मार्ग' अर्थात समांतर गंगापूर रोड प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, आमदार सीमा हिरे, गोकुळ गिते, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, उपनेते तथा गटनेता अजय बोर्स्ते, आयुक्त मनीषा खत्री, माजी महापौर दशरथ पाटील, नगरसेविका उषा बेंडकुळे, कविता लोखंडे, अंकिता शिंदे आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्यांची कामे महत्त्वाची आहेत. ज्या शहरातील रस्ते चांगले असतात त्या शहरांची प्रगति वेगाने होते. नव्या समांतर गंगापूर रोडमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. या रस्त्याला विलास शिंदे यांच्या मातोश्रींचे नाव देण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी या माध्यमातून त्यांचे स्मरण कायम राहील, असे सांगितले.

उपमहापौर शिंदेंना अश्रू अनावर

तब्बल ६५ कोटी रुपये खर्चून तयार होणारा हा रस्ता नाशिकच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे उपमहापौर शिंदे यांनी नमूद केले. या रस्त्याला 'स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे मार्ग' असे नामकरण करण्यात आले असले, तरी आईचे ऋण यातून फिटणार नाही, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला एकनाथ शिंदे यांनी नगरसेवक आणि उपमहापौर केले, माझ्या आईचे स्वप्न पूर्ण केले, असा पुनरुच्चार त्यांनी केला. या रस्त्याच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींची मदत झाल्याचे सांगताना श्रेयवादावर शिंदे यांनी पडदा टाकला.

नाशिककरांवर सिंहस्थाची जबाबदारी

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि इतर विकास प्रकल्पांमुळे नाशिकचा चेहरामोहरा बदलेल, असे नमूद करताना सिंहस्थासाठी केंद्र सरकारही भक्कमपणे पाठबळ देत असून आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशा शब्दांत शिंदे यांनी आश्वस्त केले. कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक नाशिकला येणार आहेत, त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची जबाबदारी नाशिककरांची असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

राज्यात दुष्काळासह विविध संकटे असतानाही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावरही सरकारचा भर असल्याचे शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ कमी झाला असून, राज्यात विविध ठिकाणी विकासकामांना गति देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. नाशिकमधील आरक्षण आणि डीपी रस्त्यांच्या दशरथ पाटील यांनी मांडलेल्या प्रश्नाबाबतही तपासणी करून आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.

संत कबीरनगर स्लम घोषित होणार

घंटागाडी, मलेरिया, वाहनचालकांसह विविध कंत्राटी कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्याची मागणी उपमहापौर विलास शिंदे यांनी केली. त्याचबरोबर संत कबीरनगर झोपडपट्टी अधिकृत स्लम घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या दोन्ही मागण्यांचे प्रस्ताव नगरविकास विभागाला पाठवा, नगरविकास मंत्री, गृह निर्माणमंत्री म्हणून मी लगेच त्याला मान्यता देईन, असे आश्वासन दिले. त्यामुळे उपस्थित नागरिक, कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT