नाशिक : महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत शहरात जपानी तंत्रज्ञानावर आधारित मियावाकी या पद्धतीने 15 हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. ठेकेदारामार्फत राबवून घेतल्या जाणार्या या उपक्रमावर 3.18 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. रोपांची लागवड करून तीन वर्षे संगोपनाची जबाबदारी ठेकेदारावर असणार आहे.
हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यभरात 11 कोटी वृक्षलागवडीचा निर्धार शासनाने केला आहे. नगरविकास विभागाला एक कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याअंतर्गत महापालिकेला एक लाख वृक्षलागवडीचे निर्देश आहेत. शहरात जागेची उपलब्धता कमी असताना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट मात्र मोठे आहे. त्यामुळे महापालिका वनविभागाकडून खरेदी करणार्या एक लाख रोपांपैकी 15 हजार रोपांची मियावाकी पद्धतीने लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यान विभागाकडे पर्याप्त मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने खासगीकरणातून अर्थात ठेकेदारामार्फत ही वृक्षलागवड केली जाणार आहे. यासाठी 3.18 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात रोपांचा पुरवठा महापालिकेमार्फत केला जाणार असून, ठेकेदाराकडे वृक्षारोपण व पुढील तीन वर्षांकरिता संगोपनाची जबाबदारी असणार आहे.
या रोपांची लागवड करणार
मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करताना वड, पिंपळ, बहावा, अर्जुन, पांगारा, काटेसावर, चिंच, तामण, करंज, जांभूळ, आंबा, सीताफळ, अशोक, कांचन, कैलासपती व चाफा यासारख्या भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
मियावाकी पद्धत काय आहे?
मियावाकी ही एक जपानी पद्धत आहे, ज्यामध्ये कमी जागेत दाट आणि विविधतेने युक्त असे जंगल तयार केले जाते. या पद्धतीत, स्थानिक वातावरणानुसार योग्य असलेल्या विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांची निवड करून, त्यांना एकमेकांना जोडून लावले जाते. यामुळे, जंगल खूप वेगाने वाढते आणि नैसर्गिक जंगलाप्रमाणे त्याचे स्वरूप लवकरच प्राप्त होते.