नाशिक : शहरातील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी असलेल्या नाशिक महापालिकेच्या मेनरोडस्थित नाशिक पूर्व विभागीय कार्यालयालाच अतिक्रमणांनी वेढा दिला आहे. विशेष म्हणजे, या कार्यालयात प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वारासमोर ठाण मांडून बसलेल्या अतिक्रमणधारक व्यावसायिकांची परवानगी घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे. महापालिकेचे कार्यालयच अतिक्रमणांच्या वेढ्यातून मुक्त होणार नसेल तर शहरातील अतिक्रमणे दूर होणार कशी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे
शहरात अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी केली जाणारी वाहने वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण तर आहेच पण त्याचबरोबर अतिक्रमित व्यावसायिक या वाहतूक कोंडीला सर्वाधिक जबाबदार ठरत असल्याचे वास्तव आहे. शहरातील प्रामुख्याने मेनरोड, सराफबाजार, दहीपूल, भद्रकाली मार्केट परिसर, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, निमाणी, अशोकस्तंभ, शालिमार, शिवाजी रोड, गंजमाळ, सीबीएस तसेच कॉलेजरोड, गंगापूर रोड आकाशवाणी टॉवर परिसर यासारख्या बाजारपेठांच्या परिसरात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. मेनरोडसारख्या भागात तर मूळ दुकानदारांनीच त्यांच्या दुकानांसमोरील रस्त्याची जागा भाडेतत्त्वावर छोट्या व्यावसायिकांना दिल्याने अतिक्रमणांत भर पडली आहे. या अतिक्रमणांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, मेनरोडवरील नाशिक पूर्व विभागीय कार्यालयाच्या इमारतीलाच अतिक्रमणधारकांनी वेढा घातल्याने शहरातील अतिक्रमणे हटणार कशी, असा प्रश्न आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अतिक्रमित व्यावसायिकांची गर्दी झाली आहे. कार्यालयात जाण्यासाठी देखील जागा उपलब्ध होत नसल्यामुळे पालिकेचे अतिक्रमण पथक काय काम करते, असा सवाल उपस्थित होत आहे.
रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांना अपघात घडू नयेत यासाठी महापालिकेने फुटपाथ बनविले. मात्र अतिक्रमणधारकांनीच या फुटपाथचा ताबा घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. परिणामी, लहानमोठ्या अपघातांना पादचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने किमान रस्त्यावरील, फुटपाथवरील अतिक्रमणे हटवावीत, रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.