नाशिक : पंचवटीतील मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल चौकात उभारलेली अवैध स्वागत कमान कोसळल्यानंतर अखेर महापालिकेला जाग आली आहे. महापालिका निवडणुकीतील इच्छूकांनी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जागोजागी उभारलेल्या अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरूवारपासून (दि.२५) कारवाईला सुरूवात केली आहे.
पहिल्या दिवशी सहा विभागात २५ होर्डिंग तसेच एक अनधिकृत कमान काढण्यात आली. अनधिकृत होर्डिंग आणि कमानी लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश विभागीय अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी दिली आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा लागली आहे. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत स्वागत कमानी आणि जाहिरात फलक लावले गेले आहेत. ड्रीम कॅसलजवळ भाजपच्या माजी नगरसेवकाने उभारलेली अशीच एक कमान कोसळल्यानंतर हा धोकादायक विषय ऐरणीवर आला. यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सहा विभागांमध्ये कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी दिवसभरात २५ अनधिकृत होर्डिंग आणि एक स्वागत कमान काढण्यात आली, तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपायुक्त दखणे यांनी दिली.