नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेच्या दोनशे कोटींचे ग्रीन बॉण्ड तर दोनशे कोटींचे म्युनिसिपल बॉण्ड असे एकुण ४०० कोटींच्या निधी उभारणीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. सिंहस्थ कामांसाठी महापालिकेच्या हिश्श्यातील निधी करिता हा खर्च केला जाणार आहे. प्रामुख्याने मलनिसारण योजनेसाठी हा खर्च केला जाणार आहे
सन २०२६-२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध सोयी-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. महापालिकेने १५ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा शासनाला सादर केला होता. अद्याप या आराखड्याला मंजुरी मिळालेली नाही. विधी मंडळाच्या अधिवेशनात एक हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या त्यानंतर जुलै अखेरीस सिंहस्थ प्राधिकरण समितीने ५१४० कोटी रुपयांच्या अंदाजित रक्कमेपैकी महापालिकेच्या ३२७७.५८ कोटींच्या कामांना मंजुरी दिली त्यात एकुण निधी पैकी १००४.१२ कोटी रुपये डिसेंबर २०२५ खर्च करावे लागणार आहे. प्राधिकरणाने मंजुर केलेला निधी पहिल्या टप्प्यातील आहे.
एकूण विकास आराखड्यापैकी महापालिकेला देखील खर्चाचा वाटा उचलावा लागणार आहे. परंतू तो किती याबाबत स्पष्टता नाही. सन २०१५ च्या कुंभमेळ्यात २५ टक्के खर्च महापालिकेला अदा करावा लागला होता. पहिल्या टप्प्यात ३२७७.५८ कोटी रुपये मंजूर निधी पैकी २५ टक्क्यांनुसार ८१९.५६ कोटी रुपये खर्चाचा भार उचलावा लागणार असल्याचा अंदाज गृहीत धरून त्यानुसार निधी उभारण्याची तयारी महापालिकेच्या वित्त व लेखा विभागाने केली आहे. महापालिकेच्या वाट्याला येणारा खर्च लक्षात घेवून ४०० कोटींचे रोखे उभारले जाणार आहे. यात २०० कोटी रुपये हरित रोखे (ग्रीन बॉण्ड) तर २०० कोटी रुपये म्युनिसिपल बॉण्डच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. त्या संदर्भातील महापालिकेच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे.
सशर्त परवानगी
महापालिकेच्या या बॉण्ड उभारणीला शासनाने सशर्त परवानगी दिली आहे. कर्ज निधीची परतफेड विविध कालावधीमध्ये करावी लागणार आहे. तसेच कर्ज किंवा प्रत्यक्ष उचल आवश्यकतेनुसारच करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.