नाशिक : अवकाळी पावसाने शहराची 'तुंबापुरी' केल्यानंतर अखेर महापालिकेच्या बांधकाम विभागाने पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांना सुरूवात केली आहे. यासाठी शहरात प्रभागनिहाय ३१ ठेकेदारांची नियुक्ती झाली आहे. त्यांना आठवडाभरात कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पाऊस पाणी साचणाऱ्या रस्ते तसेच चौकांच्या २०९ ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी पाणी वाहते करण्यासाठी उपाययोजनाही सुरू करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली आहे.
दहा दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले असून, नैसर्गित नाले व पावसाळी गटारींचा निचरा अपुरा ठरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात सुमारे ३ लाख ६३ हजार २२ मीटर लांबीचे पावसाळी गटार पाईप असून त्यावर १३,९४६ चेंबर आहेत. १ लाख २१ हजार मीटर लांबीचे पावसाळी नाले असून त्यातील ५० हजार ९२६ मीटर लांबीची साफसफाई करणे आवश्यक आहेत. दरवर्षी मे महिन्याच्या प्रारंभीच नालेसफाईची कामे केली जातात. यंदा मात्र वेळेत कामे सुरू होऊ शकली नाहीत. त्यामुळे अवकाळी पावसाचे पाणी तुंबून राहिले. परिणामी, प्रशासनाला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. अखेर महापालिकेच्या बांधकाम विभागाने पावसाळापूर्व नालेसफाईला सोमवारपासून प्रारंभ केला. यासाठी प्रभागनिहाय ३१ ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत नालेसफाई आणि चेंबर्स दुरूस्तीची कामे करण्यात येत आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून विद्युत तारांवर लोंबकळणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. मात्र, छाटलेला पालापाचोळा त्या ठिकाणीच टाकून देण्यात आला. वादळी वाऱ्यामुळे तुटलेल्या झाडांच्या फांद्या आणि त्याचा पालापाचोळाही उद्यान विभागाने उचललेला नाही. परिणामी, हा सर्व कचरा अवकाळी पावसाच्या पाण्यात वाहून जाऊन गटाऱ्यांच्या चेंबर्समध्ये अडकला. त्यामुळे चेंबर्स चोकअप झाले, असा दावा बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे.
शहरातील नाल्यांची एकूण लांबी (मीटर) - १,२१,०१
आरसीसी गटारींची लांबी (मीटर) - ३,६३,०२२
गटारींवरील चेंबर्सची संख्या - १३,९४६
पावसाळी खुली गटार लांबी (मीटर) - ९२,७७१
महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत पावसाळापूर्व कामांना सुरूवात झाली आहे. यासाठी प्रभागनिहाय ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. आठ दिवसांत पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.संजय अग्रवाल, शहर अभियंता, मनपा, नाशिक महानगरपालिका.