श्वानदंश  File Photo
नाशिक

NMC News Nashik | अबब, वर्षभरातच 31,873 जणांना श्वानदंश

मनपाच्या निर्बिजीकरण मोहिमेनंतरही मोकाट कुत्र्यांचा प्रश्न जैसे थे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आसिफ सय्यद

महापालिका गेल्या १८ वर्षांपासून भटक्या व मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी मोहीम राबवत असली तरीही त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवता आलेले नाही.

शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच असून, गेल्या वर्षभरात तब्बल ३१ हजार ८७३ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. सामान्य समजुतीप्रमाणे लहान मुले व महिला यांना अधिक लक्ष केले जाते असे वाटत असले तरी, वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीनुसार प्रौढ नागरिकच यामध्ये अधिक बळी ठरल्याचे अधोरेखित होत आहे.

नाशिक महापालिका २००७ पासून भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी निर्बिजीकरण मोहीम राबवत आहे. या मोहिमेवर गेल्या १७ वर्षात कोट्यवधींचा खर्च झाला असून सव्वा लाखांहून अधिक कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. मात्र, प्रजनन दर जास्त असल्यामुळे अद्यापही कुत्र्यांच्या संख्येवर पूर्ण नियंत्रण मिळविता आलेले नाही. उघड्यावर टाकलेले अन्न, शहरात सर्रासपणे केली जाणारी उघड्यावरील मांस, मासळी विक्री यामुळे भटक्या कुत्र्यांची केवळ गुजराण होत नाही तर ते हिंस्त्र बनले असून त्यातून श्वानदंशच्या घटना वाढीस लागल्या आहेत. गेल्या वर्षभरातच तब्बल ३१ हजार ८७३ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद महापालिकेच्या विविध रुग्णालयांतून वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झाली आहे. कुत्रा चावल्यास ‘रेबीज’सारखा प्राणघातक आजार उद्भवू शकतो. यासाठी श्वानदंशावर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. श्वानदंश झालेल्यांना ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाते.

Nashik Latest News

गत वर्षभरात श्वानदंश झालेल्यांना दिलेली रेबीज लस

रुग्णालय - लस घेणाऱ्यांची संख्या

  • बिटको रुग्णालय - १६,४५९

  • डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय - ४,७७९

  • इंदिरा गांधी रुग्णालय - २,५९३

  • स्वामी समर्थ रुग्णालय - ६,३०७

  • गंगापूर दवाखाना - ६४३

  • दसक-पंचक दवाखाना - १०९२

  • एकूण - ३१,८७३

प्रौढच अधिक लक्ष्य

भटकी व मोकाट कुत्र्यांकडून लहान मुले व महिलांना लक्ष्य केले जात असल्याचा सर्वसाधारण समज आहे. मात्र महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडील गेल्या वर्षातील आकडेवारीनुसार लहान मुलांच्या तुलनेत श्वानदंश झालेल्यांमध्ये प्रौढांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे श्वानदंश झालेल्यांमध्ये महिलांपेक्षा पुरूषांची संख्या अधिक आहे.

काय आहे रेबीज?

प्रामुख्याने कुत्रा चालवल्याने रेबीज होतो. हा रोग उष्णरक्त वर्गीय प्राण्यामध्ये दिसून येणारा अत्यंत घातक विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचे विषाणू पशुधनाच्या मज्जासंस्थेस बाधीत करतात. बाधीत पशुधनाच्या ज्या भागात मज्जासंस्थेचे दाट जाळे अशा भागातील स्त्रावातून हे विषाणू शरीरातून बाहेर पडतात. जसे पशुधनाच्या तोंडातून येणारी लाळ बाधीत पशुधनाच्या चावण्याने (दंश) या विषाणूचा प्रामुख्याने प्रसार होतो. हा रोग झुनॉटीक म्हणजे प्राण्यांपासून मानवाला होतो.

श्वानदंश झाल्यास करावयाच्या उपाययोजना

मज्जा संस्थेसंबंधी लक्षणे दिसून आल्यास अशा पशुधनातील उपचार काळजीपूर्वक व संरक्षक प्रावणे (पीपीई फीट, ग्लोब्ज, मास्क, फेसशिल्ड) वापरावी. बाधीत पशुधन चावल्यास किंवा लाळेशी संपर्क आल्यास साबणाच्या द्रावणाने किंवा डिटर्जंटच्या द्रावणाने जखम धुवुन काढावी. जखमेवर २ टक्के अॅक्वियस क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड लावावे. त्यानंतर टीक्चर आयोडीन, पोव्हीडोन आयोडीन लावावे व जखमेस पट्टी बांधू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT