नाशिक : राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रम अर्थात एन-कॅप अंतर्गत महापालिकेने शहरात हाती घेतलेल्या २० पैकी १२ ई- चार्जिंग स्टेशन कार्यान्वित झाले असून, गेल्या महिनाभरात ५६५ वाहनधारकांनी आपली इलेक्ट्रीक वाहने चार्ज केली आहेत. या वाहनांच्या चार्जिंगसाठी ९ हजार ३४० युनिटचा वापर झाला असून त्यामाध्यमातून महापालिकेने एक लाख ५५ हजार ८२ रुपयांची शुल्क वसुली केले आहे. महापालिकेच्या या ई - चार्जिग स्टेशनचा वापर टप्प्याटप्याने वाढेल, असा दावा अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांनी केला आहे.
शासनाच्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने शहरात २० ठिकाणी ईलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्सची उभारणी करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. केंद्र शासनाच्या एन कॅपअंतर्गत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारणीसाठी महापालिकेला निधी मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात दहा कोटी रुपये खर्चातून २० ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. 'सर्वोटेक पॉवर सिस्टिम लिमिटेड' या कंपनीमार्फत ई-चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे काम केले जात आहे.
आतापर्यंत २० पैकी १२ ई-चार्जिंग स्टेशनची स्थापत्यविषयक कामे पूर्ण झाली असून या ठिकाणी महावितरणच्या जोडणी होवून ई - चार्जिंग स्टेशन नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. तर एका ठिकाणी वीज जोडणीची प्रक्रिया सुरू आहे. सप्टेंबर महिन्यापासून १२ ई-चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रीक वाहनांसाठी सुरू करण्यात आले आहे. त्यात महिनाभरात चार्जिंग स्टेशनचा ५६५ इलेक्ट्रिक वाहनांनी वापर केला आहे. या वाहनधारकांनी ९ हजार ३४० युनिटचा वापर केला असून त्यात पालिकेला एक लाख ५५ हजार ८२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे शहरातील इलेक्ट्रिक वाहनधारकांकडून ई- चार्जिग स्टेशनचा वापर वाढत असल्याचे चित्र आहे.
असे आहेत दर
मनपाच्या ईव्ही चार्जिंग स्टेशनची क्षमता- ८० केव्ही
खासगी ईव्ही चार्जिंगचे दर (प्रति युनिट)- २३.५० रुपये
महापालिकेने निश्चित केलेले दर(प्रति युनिट)- १६.६० रुपये
एन कॅप अंतर्गत २० ई -चार्जिंग स्टेशन उभारले जात असून १२ कार्यान्वित झाले आहेत. वाहनधारकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ना नफा ना तोटावर ही चार्जिग स्टेशन चालविले जाणार आहेत.अविनाश धनाईत, अधिक्षक अभियंता, मनपा
येथे ई-चार्जिंग स्टेशन्स
राजीव गांधी भवन मुख्यालय.
महापालिका सातपूर विभागीय कार्यालय.
महापालिका सिडको विभागीय कार्यालय.
तपोवन बस डेपो.
अमरधाम फायर स्टेशन पंचवटी.
राजे संभाजी स्टेडियम सिडको.
बिटको हॉस्पिटल, नाशिकरोड.
कृषी नगर जॉगिंग ट्रॅक.
बी. डी. भालेकर मैदान.
स्व. प्रमोद महाजन उद्यान.
महात्मा नगर क्रिकेट मैदान.
गणेशवाडी भाजी बाजार इमारत.
अंबड लिंक रोडवरील मनपा मैदान.