घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीचा आकडा कसाबसा उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने सरकत असताना महापालिकेच्या व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांकडील भाडेवसुली मात्र अत्यल्प अर्थात जेमतेम ३.८९ टक्के आहे. दीड हजार गाळेधारकांकडे तब्बल ४९.२८ कोटींचे भाडे थकीत असल्यामुळे प्रशासनाने या गाळेधारकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
महापालिकेची व्यापारी संकुले - ६२
व्यापारी संकुलांतील गाळ्यांची संख्या - १९८७
भाजीमार्केट, खोका मार्केटमधील ओट्यांची संख्या - ३५२
गाळे-ओट्यांची एकूण संख्या - २३४०
एकूण थकबाकीदार गाळेधारक - १५००
नाशिक महापालिकेचे शहर परिसरात सहाही विभागांमध्ये एकूण ६२ व्यापारी संकुले असून त्यात १९८७ गाळे, ३५३ ओटे असे एकूण २३४० गाळे, ओटेधारक आहेत. शहरातील बेरोजगार तसेच छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना लिलावाच्या माध्यमातून तसेच सोडतीद्वारे या गाळे, ओट्यांचे महापालिकेच्या विविध कर विभागाकडून वाटप केले जाते. त्यानुसार संबंधित सर्वच व्यापारी संकुलांमधील गाळे आणि ओटे भाडेकराराने वाटप केले आहेत.
गाळेधारकांकडील विभागनिहाय थकबाकी
विभाग थकबाकी (आकडे कोटीत)
सातपूर - ४.३५
पंचवटी - २.५९
सिडको - १.६१
नाशिक रोड - ६.५३
नाशिक पश्चिम - २७.८१
नाशिक पूर्व - ६.३५
एकूण - ४९.२८
दरम्यान, संबंधित गाळेधारकांकडे मोठ्या प्रमाणावर भाडे थकीत असल्याने त्याचा फटका महापालिकेला सहन करावा लागत आहे. गाळ्यांचे भाडे अधिक असल्याने ते कमी करण्याची गाळेधारकांची जुनी मागणी आहे. खासगी मालमत्तेतील गाळ्यांच्या बरोबरीने मनपाच्या गाळ्यांचे भाडे असल्याने आर्थिकदृष्ट्या ते परवड नसल्याने गाळेधारकांनी यापूर्वी आंदोलन करत शासनदरबारी देखील रेडीरेकनरप्रमाणे भाडे न आकारता त्यात सवलत द्यावी, अशी मागणी केली होती. गतवर्षी शासनाने ६ नोव्हेंबर रोजी आदेश जारी करत मनपाच्या मिळकतींवरील भाडे दराविषयी महापालिकेला मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून, या समितीने गाळ्यांचे भाडे निश्चित करावयाचे आहे. मात्र, अद्याप समितीच्या बैठकीला मुहूर्त लाभू शकलेला नाही