नाशिक : नाशिक महापालिकेवरील 'स्पीलओव्हर' अर्थात मंजूर कामांचे दायित्व तब्बल १२८० कोटी ३९ लाखांवर पोहोचले आहे. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच स्पीलओव्हरचा आकडा इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने २०२५-२६ या आर्थिक वर्षात सिंहस्थ कामे वगळता अन्य नवीन विकासकामांसाठी निधी मिळणे दुरापास्त होणार आहे.
'अ' चालू असलेली कामे- १७१.६१ कोटी
'ब' कार्यादेश द्यावयाची कामे- ५४.२० कोटी
'क' निविदा प्रक्रियेतील कामे- १६३.४२ कोटी
'ड' प्रशासकीय मान्यता असलेली कामे- २५.१९ कोटी
'इ' नव्याने प्रस्तावित कामे- १८६.८१ कोटी
अ+ब+क+ड+इ एकूण - १२८०.३९ कोटी
महापालिकेच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास महासभेने नुकतीच मंजुरी दिली आहे. निवासी, अनिवासी व औद्योगिक घरपट्टीत सूचविलेली वाढ कायम ठेवत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी स्थायी समितीने शिफारस केलेले ३०५४ कोटींचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक महासभेने 'जैसे थे' मान्य केले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या सुधारीत तसेच २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या मूळ अंदाजपत्रकात सिंहस्थ कामांसाठी ४३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सिंहस्थ कामांना या अंदाजपत्रकातून चालना मिळणार असली तरी सिंहस्थ वगळता हाती घ्यावयाची अन्य नागरी विकासाच्या कामांसाठी मात्र २०२५-२६ या आर्थिक वर्षात निधीची मोठी चणचण भासणार असल्याचे या अंदाजपत्रकातील स्पीलओव्हरच्या आकडेवारीवरून दिसत आहे. महापालिकेवर तब्बल १२८० कोटी ३९ लाखांचे मागील मंजूर कामांचे दायित्व अर्थात स्पीलओव्हर असल्याचे या अंदाजपत्रकातील जमा-खर्चाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पीलओव्हरचा आकडा इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या दायित्वापैकी ३१ मार्चअखेर २६६ कोटी ५२ लाख रुपयांच्या कामांची देयके अदा केली जातील तर २०२५-२६ या आर्थिक वर्षात ६०१ कोटी २४ लाखांच्या विकासकामांचा खर्च अदा केला जाईल, असे अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सिंहस्थ कामांसाठी अंदाजपत्रकात प्राधान्याने तरतूद केली असल्याने स्पीलओव्हरचा फटका अन्य नागरी कामांना बसणार आहे.