नाशिक : भाजपपाठोपाठ शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यालयातही मुलाखतीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी दिसून आली. पहिल्याच दिवशी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सातपूर व सिडको विभागातील ११ प्रभागांतील ११७ इच्छुकांनी मुलाखती देत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.
नाशिक महापालिकेच्या रणधुमाळीला वेग आला आहे. भाजपने इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीचा टप्पा पूर्ण केल्यानंतर गुरुवारी (दि.१८) शिवसेना शिंदे गटाने देखील मायको सर्कल येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात मुलाखतींच्या प्रक्रियेला सुरूवात केली. शिंदेगटाकडे साडेतीनशेहून अधिक इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. पहिल्या दिवशी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाचे नेते तथा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते विजय करंजकर, अजय बोरस्ते, संपर्कप्रमुख विलास शिंदे, जयंत साठे, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत लवटे, महानगरप्रमुख प्रविण तिदमे उपस्थित होते.
असे विचारले प्रश्न
मुलाखत घेताना पदाधिकाऱ्यांनी इच्छूक उमेदवारांवर प्रश्नांची सरबत्ती केली. जनसंपर्काचे माध्यम काय, जनसंपर्कासाठी कोणते उपक्रम राबवले, तत्कालिन मुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील 'लाडकी बहिण योजने'साठी किती अर्ज भरून घेतले, प्रभागात कुठे घरभेटी दिल्या, गतवेळी निवडणूक लढवली असल्यास किती मते मिळाली होती, प्रभागातील अन्य पक्षांकडील इच्छूक उमेदवार कोण हे प्रश्न विचारण्यात आले.