नाशिक : अवजड वाहतुकीमुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्याचा फटका महापालिकेला बसत आहे. त्यामुळे अवजड वाहतूक महापालिकेच्या रस्त्यांवरून न करता राज्य, राष्ट्रीय महामार्गावरूनच वळवावी, अशा आशयाचे पत्र महापालिकेने पोलिस प्रशासनाला सादर केले आहे.
महापालिकेच्या रस्त्यांवरून पोलिसांनी अवजड वाहतूक वळविली आहे. परंतु, महापालिकेने तयार केलेले रस्ते अवजड वाहने चालतील एवढ्या क्षमतेची नसल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्ते दुरावस्थेचा ठपका नाशिक महापालिकेवर ठेवला जात आहे. महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीची गर्दी कमी करण्यासाठी रिंगरोड तयार केले असले तरी ते रस्ते अवजड वाहनांसाठी नाही. अवजड वाहनांमुळे रस्ते खराब झाले अनेक भागात वाहनांची चाके फसतील एवढे खड्डे पडले आहेत. खड्डे व रस्त्यांचा खर्च महापालिकेला परवडणारा नसल्याने वाहतूक शाखेने पत्र व्यवहार करून राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक वळविण्याची विनंती केली आहे.
अवजड वाहने चालतील एवढी महापालिकेच्या रस्त्यांची क्षमता नाही. त्यामुळे पुर्ववत राष्ट्रीय, राज्य महामार्गावरूनचं अवजड वाहने चालविणे सोईस्कर आहे. त्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.रवींद्र बागुल, कार्यकारी अभियंता, वाहतूक शाखा, महापालिका.