नाशिक : महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील अनागोंदी कारभारावर नूतन आयुक्त मनिषा खत्री यांनी फुली मारली आहे. कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे. विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या तसेच कामाव्यतिरीक्त कार्यालयाबाहेर फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. अशा कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी खातेप्रमुखांवर टाकण्यात आली आहे. यासंदर्भातील परिपत्रक आयुक्तांनी जारी केले आहे.
गेल्या अडीच पावणेतीन वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. यापूर्वीच्या आयुक्तांचा प्रशासनावर वचक नसल्यामुळे महापालिकेत अनागोंदी माजली होती. अधिकारी-कर्मचारी मनमानी पध्दतीने कारभार करत असल्याने नागरी सेवा सुविधांविषयी नागरिकांच्या तक्रारी होत्या. महापालिका प्रमुखच मुख्यालयात हजर राहत नसल्याने अनेकांना तर मोकळे रानच झाले होते. बरेचसे कर्मचारी बाहेर पडून चहापान करतानाच अनेकदा दिसून येत असल्याने महापालिकेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिक तसेच अभ्यांगतांना तिष्ठत बसावे लागत होते. महापालिकेत बेशिस्ती माजली होती. अधिकारी देखील दुपारच्या वेळी साईट व्हिजीटचे नाव करत घरी आराम करण्यासाठी वा खासगी कामासाठी निघून जात असल्याने कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नव्हता. आता नूतन आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर वर्षाच्या पहिल्याच दिवशी खातेप्रमुख तसेच विभागीय अधिकाऱ्यांसाठी परिपत्रक जारी करत बेशिस्त कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सर्व विभागप्रमुख, विभागीय अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत आपआपल्या कार्यालयात थांबून कामकाज करणे, नागरिकांच्या समस्या तसेच तक्रारींचे निराकरण करणे अनिवार्य असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कार्यालयाबाहेर जाणे जरुरी असल्यास तशी नोंद नोंदवहीत करणे आवश्यक असल्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांमार्फत कार्यालयीन वेळेत अचानकपणे मुख्यालयातील कोणत्याही विभागास अथवा विभागीय कार्यालयास भेट देऊन तेथील उपस्थितीची तपासणी करण्यात येणार आहे. विनापरवानगी गैरहजार आढळून आल्यास संबंधीत कर्मचारी व अधिकाऱ्यांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.