नाशिक : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी नाशिक विभागाचे माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक करण्यात आली आहे. विद्यमान उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण हे अटक टाळण्यासाठी प्रयत्न करत आहे.
जळगाव जिल्ह्यातील १० शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांची संगनमत करून शालार्थ प्रणालीत बनावट आयडी वापरत शासनाची जवळपास १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप संशयित आरोपींवर ठेवण्यात आलेला आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना सुद्धा ऑक्टोबर महिन्यात आयुक्तालयातून निलंबित करण्यात आले आहे. लेखाधिकारी उदय पंचभाई, राज मोहन, रामचंद्र पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी अविनाश पाटील, नीलेश निंबा पाटील, मनोज रामचंद्र पाटील, दत्तात्रय पाटील यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी चव्हाण झाले आरोपी
या प्रकरणांत विद्यमान शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण हे फिर्यादी आहेत. मात्र, जसजसा या प्रकरणाचा तपास पुढे गेला, त्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा सहभाग असल्याची निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी केले आहे.
उपासनीकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न
नितीन उपासनी यांनी एका मोठ्या पक्षाच्या संबंधित असलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नावे सांगून अटक टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणांत त्यांच्या विरुद्ध भक्कम पुरावे असल्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले.
शेकडो कोटींची मालमत्ता
या प्रकरणातील आरोपींनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता जमवली आहे, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. शिक्षण विभागातील भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात आहे, हे यावरून सिद्ध होते.