नाशिक: कोणत्याही मशिदीजवळ हिंदूंचे दुकान असते का ? मग आपल्या पवित्र कुंभमेळ्यामध्ये मुस्लिमांच्या दुकानाची अजिबात गरज नसल्याचा खळबळजनक वक्तव्य मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे यांनी केले.
मत्स्यव्यवसाय आढावा बैठकीसाठी नाशिकच्या दौऱ्यावर आलेले मंत्री राणे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेताना ही खळबळजनक वक्तव्ये केली. मुस्लीम हिंदूंच्या दुकानातून कोणतेच साहित्य खरेदी करत नाहीत. त्यामुळे येत्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी मुस्लिमांच्या दुकानांवर बंदी आणा. हिंदू राष्ट्रात काय ठेवावे आणि काय नाही, याबाबत सरकार सकारात्मक कार्य करत आहे. मुस्लीम समाज सरकारी योजनांचा उपभोग १०० टक्के घेतो अणि मतदान करताना मोदी नको, असे बोलतो. हिंदूंचे सरकार जर चालत नसेल तर आणि सरकारी नियम जर पाळायचा नसेल तर त्यांनी पाकिस्तानला जावे. कारण पाकिस्तानमध्ये भगवद्गीतेचे वाचन करू दिले जात नाही, असे प्रतिपादन राणे यांनी केले.
कुंभमेळ्यात सर्व हिंदूंची दुकाने असावीत. मुस्लिमांचे दुकान लागले नाही पाहिजे. ते वस्तू देताना थुंकी लावून देतात. दुकानाच्या बाहेर जय श्री राम फूलभांडार, असे बॅनर लावतात आणि आतमध्ये अब्दुल बसलेला असावा. मुस्लीम मूर्ती पूजन करत नाही. हिंदू धर्म मानत नाही. आपले धार्मिक साहित्य विकण्यासाठी मुस्लीम कशाकरता हवे? राष्ट्रभक्त मुसलमानांवर आमचा कुठलाही आक्षेप नाही. पण जिहादी मुस्लीम आम्हाला आमच्या देशात नको, असे प्रतिपादन त्यांनी केले. मालेगावमध्ये नकली नोटांच्या प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की, तेथील मौलानाच नकली असतो तर त्यांच्याकडे वस्तूदेखील नकली असणारच, असा टोला लगावला.
निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ठराविक नेत्यांवर निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपवलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या निवडणुका स्थानिक पातळीवर विचार करून लढविल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
कीर्तनकार निवृत्ती देशमुख यांनी आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले व ते लोकांना मुला-मुलींचे लग्न अतिशय कमी खर्चात करायचा सल्ला देतात, याकडे राणे यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले असता ते म्हणाले की, याबाबत तुम्ही अधिक लक्ष घालू नका. इतर धर्मांतही मोठे विवाहसोहळे होतात, त्याकडेही तुम्ही पाहत जा, अशा शब्दांत देशमुख यांची पाठराखण केली. जरांगे-पाटील यांना हत्येची धमकी आली असली तरी मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यात झीरो टॉलरन्सचे धोरण स्वीकारलेले आहे. त्यामुळे आमच्या सरकारकडून सर्वांचे रक्षण केले जाईल, असा दावा राणे यांनी यावेळी केला.
मालेगावातही बरेच बोगस मतदान
मालेगावात बरेच मतदान बोगस झाल्याचा दावा करताना राणे म्हणाले, तेथे यादीत केवळ एकाच नावाचे अनेक मुस्लीम सापडतील. उद्धव ठाकरेंनी तिथेही जाऊन हे विचारायला पाहिजे होते. मुस्लिमांबाबत एकही प्रश्न विचारला जात नाही. फक्त हिंदूंच्याच बाबतीत प्रश्न विचारले जात आहे.