नाशिक : नाशिकचा पारा घसरला असून, महाबळेश्वरपेक्षा जिल्ह्यात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. द्राक्षपंढरी असलेल्या निफाडमध्ये सोमवारी (दि.१६) पारा ५.६ अंशांपर्यंत खालावला. यंदाच्या हंगामात हे सर्वात निच्चांकी तापमान ठरले असून, तालुक्यातील जनता हाडे गोठविणाऱ्या थंडीचा अनुभव घेत आहेत. द्राक्षबागांसाठी हे हवामान नुकसानकारक आहे. नाशिक शहरातही थंडीचा जोर वाढला असून, पारा ९.४ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे शहरवासीय गारठून गेले आहेत.
हिमालयीन भागातील बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांचा प्रकोप वाढला आहे. त्यामुळे राज्यातील सरासरी तापमानात लक्षणीय घसरण झाली. उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यातही विशेष करून नाशिक जिल्ह्याच्या पाऱ्यात मोठी घसरण झाली आहे. निफाडमध्ये पारा ६ अंशांखाली आला आहे. परिणामी, अवघ्या तालुक्यात थंडीचा प्रकोप वाढला आहे. हवेत दिवसभर गारठा जाणवत असल्याने तालुकावासीयांनी उबदार कपडे परिधान करणे पसंत केले. तर दुसरीकडे हाडे गोठविणाऱ्या थंडीमुळे द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. पहाटे बागांमध्ये दवबिंदू पडत आहेत. थंडीच्या कडाक्याने द्राक्षमण्यांना तडे जाऊन फळात साखर उतरण्याच्या प्रक्रियेला बाधा पोहोचण्याची भीती आहे. त्यामुळे जीवापाड जपलेल्या बागा वाचविण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरू आहे.
नाशिक शहरात पारा दहा अंशांखाली घसरला आहे. त्याचवेळी दिवसभर वातावरणात थंड वारे वाहत होते. त्यामुळे नागरिक गारठून गेले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरवासीयांनी दिवसभर उबदार कपडे परिधान केले. तसेच सायंकाळनंतर ठिकठिकाणी शेकोट्यांभाेवतही गर्दी दिसून आली.
वायव्य भारतात समुद्रसपाटीपासून दीड किमी उंचीपर्यंत व मध्य प्रदेशातील विदिशाच्या आसपास केंद्रबिंदू स्थित आहे. घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने प्रत्यावर्ती बाहेर फेकणाऱ्या चक्रिय थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील थंडी महाराष्ट्रात पूर्व दिशेने फेकली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट, तर काही ठिकाणी थंडीच्या लाटसदृश स्थिती जाणवत आहे, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये सरासरी १ ते ६ अंशांपर्यंत तापमान घटले आहे. पुढील काही दिवस थंडीचा मुक्काम कायम राहील, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.