Nashik Niphad Dry Port Railway Connectivity Approval 
नाशिक

Nashik Niphad Dry Port Railway Connectivity Approval|निफाड ड्रायपोर्ट रेल्वे जोडणीस मान्यता, मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश

शेतकऱ्यांना निर्यातीच्या अधिक संधी

पुढारी वृत्तसेवा

येवला : पुढारी वृत्तसेवा

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या २५०० मेट्रिक टन क्षमतेच्या 'पेरिशेबल कार्गो सेंटर'ला निफाड ड्रायपोर्टशी जोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रेल्वे जोडणीला जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने सकारात्मक प्रतिसाद दिला. येवला-पिंपळस महामार्ग परिसरातून कसबे सुकेणे रेल्वेस्थानकाच्या माध्यमातून निफाड ड्रायपोर्टला जोडणाऱ्या या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.

येवला-लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कांदा, द्राक्षे, फळे व भाजीपाल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत थेट प्रवेश मिळावा, शेतमाल निर्यातीला चालना मिळावी तसेच वाहतुकीचा खर्च आणि वेळ वाचावा, यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री भुजबळ यांनी यासंदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण पत्रव्यवहारानंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे ही माहिती कळविली आहे.

या रेल्वे जोडणी प्रकल्पाचा सविस्तर व्यवहार्यता अभ्यास अहवाल (DFSR) तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. प्रस्तावित रेल्वे जोडणी प्रत्यक्षात साकारल्यास येवला परिसरातील शेतमाल शीतगृह आणि कंटेनर सुविधांच्या माध्यमातून निफाड ड्रायपोर्टमार्गे जवाहरलाल नेहरू पोर्ट तसेच वाढवण बंदराशी जोडला जाऊ शकेल. परिणामी, नाशवंत शेतमालाची नासाडी कमी होण्यासह वाहतुकीचा खर्च व वेळ वाचणार असून, शेतकऱ्यांना निर्यातीच्या अधिक संधी उपलब्ध होतील.

याशिवाय येवला-पिंपळस महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० आणि राज्य महामार्ग क्रमांक ३० या मार्गाद्वारे निफाड ड्रायपोर्टला थेट रस्ते जोडणी उपलब्ध करून देण्याच्या पर्यायांचाही नॅशनल हायवेज लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट कंपनीमार्फत अभ्यास सुरू आहे. या प्रकल्पाचा तांत्रिक सुसाध्यता व सविस्तर व्यवहार्यता अभ्यासपूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाहीला गती मिळेल, असा विश्वास मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

हा प्रकल्प साकारल्यास येवला, लासलगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी सक्षम निर्यातव्यवस्था निर्माण होण्यास मदत होणार असून, जिल्ह्याच्या कृषी आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT