चांदवड : सुनील थोरे
ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात नाशिक जिल्ह्याने यंदा उल्लेखनीय कामगिरी करत राज्यपातळीवर आपली छाप उमटवली आहे. भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या पंचायत विकास निर्देशांक २०२३-२४ मध्ये महाराष्ट्रातील पहिल्या १०० ग्रामपंचायतींमध्ये नाशिक जिल्ह्याच्या तब्बल ३८ ग्रामपंचायतींचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे, यापैकी चांदवड तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींनी स्थान मिळवत तालुक्याची दमदार उपस्थिती नोंदवली असून, निंबाळे ग्रामपंचायतीने 'सुशासन युक्त पंचायत' या थीममध्ये राज्यात प्रथम मानांकन पटकावले आहे.
पंचायत विकास निर्देशांक हा ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण कार्यक्षमतेचा महत्त्वपूर्ण निकष मानला जातो. सुशासन, पारदर्शकता, आर्थिक शिस्त, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास, लोकसहभाग आणि शाश्वतता या विविध घटकांच्या आधारे ग्रामपंचायतींचे मूल्यांकन केले जाते. या सर्व निकषांमध्ये नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
चांदवड तालुक्यातील निंबाळे ग्रामपंचायतीने 'सुशासन युक्त पंचायत' या गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवत विशेष यश संपादन केले. पारदर्शक प्रशासन, नागरिकाभिमुख योजना, वेळेत कामांची अंमलबजावणी आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यामुळे हे मानांकन मिळाले आहे. या यशामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
या यशामध्ये ग्रामपंचायत अधिकारी शुभांगी सुरसे, सरपंच रबिना सोनवणे, उपसरपंच दीपक घुमरे तसेच सर्व सदस्य आणि ग्रामस्थांची एकजूट व परिश्रम महत्त्वाचे ठरले. गावातील सर्व शासकीय कामे ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली असून, शासनाच्या मूल्यांकनात १०० पैकी ९३.५८ गुण प्राप्त करत निंबाळे ग्रामपंचायतीने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे.
निंबाळे ग्रामपंचायती अंतर्गत गावात करण्यात आलेली सर्व शासकीय कामे ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात आली. शासनाच्या 'सुशासन युक्त पंचायत' थीममध्ये १०० पैकी ९३.५८ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाचे मानांकन निंबाळे ग्रामपंचायतीला मिळाले. यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.- शुभांगी सुरसे, ग्रामपंचायत अधिकारी