नाशिक : सहा वर्षांच्या कालखंडानंतर निमा इंडेक्सला उद्योजकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने येणाऱ्या काळात नाशिकमध्ये सुमारे दोन हजार कोटींची गुंंतवणूक येण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे केले. (NIMA Index Exhibition)
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) तर्फे त्र्यंबकरोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित चार दिवशीय निमा इंडेक्स-2024 या औद्योगिक प्रदर्शनाचा सोमवारी (दि. 9) समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने आणि एचएएलचे महाव्यवस्थापक सुब्रतो मंडल उपस्थित होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, सचिव निखिल पांचाळ, राजेंद्र वडनेरे, मनिष रावल आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की निमा इंडेक्समधून नवनवीन तंत्रज्ञानाचे दर्शन घडले. अशाप्रकारची प्रदर्शने सातत्याने भरवली पाहिजे जेणेकरुन सर्वसामान्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळू शकेल. एचएएल नाशकात नवीन प्रोजेक्ट आणत असून त्यासाठी आम्हाला नाशिकच्या उद्योजकांच्या पाठबळाची गरज आहे. एचएएल एअर कनेक्टिव्हिटी वाढविणार असल्याचे सुतोवाचही एचएएलचे महाव्यवस्थापक सुब्रतो मंडल यांनी आपल्या भाषणात केले. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी राजेंद्र कोठावदे, गोविंद झा, कैलास पाटील, नितीन आव्हाड, सतीश कोठारी, हेमंत खोंड, दिलीप वाघ, रावसाहेब रकिबे, नानासाहेब देवरे, शर्वरी गोखले, ललित सुराणा, प्रियदर्शन टांकसाळे, किरण खाबिया, हर्षद बेळे, सुधीर बडगुजर, गोविंद बोरसे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
गेल्या दोन वर्षांपासून निमाच्या कार्यात विद्यमान अध्यक्ष धनंजय बेळे यांनी लक्ष घातल्यानंतर या संघटनेने उत्तुंग भरारी घेतली आहे. अनेक बड्या कंपन्या वेंडर्स मिळाले. रोजगार निर्मितीच्या अनेक संधी या प्रदर्शनाने उपलब्ध झाल्या. कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे चित्रही प्रदर्शनात बघायला मिळाले. कार्यक्रमास डी.जी. जोशी,आयमाचे अध्यक्ष ललित बूब, निखिल तापडिया,गिरीश पालवे आदी उपस्थित होते.